डॉ. अग्रवाल्स हेल्थकेयरचा आयपीओ बुधवारी होणार खुला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डॉ. अग्रवाल्स हेल्थकेयर लिमिटेड यांचा आयपीओ याच आठवड्यात गुंतवणूकीसाठी खुला होणार असून या आयपीओअंतर्गत 3027 कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत.
सदरचा कंपनीचा आयपीओ 29 जानेवारी रोजी खुला होणार असून 31 जानेवारीपर्यंत त्यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. सदरचा आयपीओ 5 फेब्रुवारी रोजी मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यावर सूचीबद्ध होणार आहे. 3027 कोटी रुपये आयपीओ अंतर्गत कंपनी उभारणार असून 300 कोटी रुपयांचे समभाग विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. सध्याच्या गुंतवणूकदारांकडून ऑफर फॉर सेल अंतर्गत 2727 कोटी रुपयांचे समभाग विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहेत.
इशु किंमत, राखीव हिस्सा
382-402 रुपये प्रति समभाग अशी समभागाची किंमत निश्चित करण्यात आली आहे. 35 समभागांसाठी बोली लावायची असल्यास 402 रुपये प्रति समभाग याप्रमाणे 14070 रुपये गुंतवावे लागणार आहेत. रिटेल गुंतवणूकदारांसाठी इशूचा 35 टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला असून 50 टक्के हिस्सा पात्रताधारक संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के इशू राखीव ठेवण्यात आला आहे.
कंपनीबाबत....
डॉक्टर अग्रवाल्स हेल्थकेअर लिमिटेड कंपनी 2010 मध्ये स्थापन करण्यात आली असून मोतीबिंदू व डोळ्याशी संबंधित इतर शस्त्रक्रिया करण्यासोबतच डोळ्यांसंबंधीत सेवा कंपनी देते. चष्मे, कॉन्टॅक्ट लेन्स या संबंधित उत्पादने देखील कंपनी विकते. आर्थिक वर्ष 2024 मध्ये पाहता भारतामध्ये डोळ्यांशी संबंधित सेवा क्षेत्रामध्ये यांचा वाटा 25 टक्के इतका आहे.