आयआरसीटीसीचे वेबसाइट आणि अॅप डाऊन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) वेबसाइट आणि मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत, ज्यामुळे अनेक प्रवासी ट्रेनचे तिकीट बुक करू शकले नाहीत. अनेक वापरकर्त्यांनी ही समस्या सोशल मीडियावर नोंदवत संताप व्यक्त केला आहे. आपले तिकीट बुकिंग करण्यासाठी आयआरसीटीसी प्लॅटफॉर्म वापरू शकले नसल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे. डाउनडिटेक्टर या ऑनलाइन व्यत्ययांचा मागोवा घेणाऱ्या सेवांनाही याची माहिती दिली आहे.
यामुळे 2,500 हून अधिक वापरकर्ते प्रभावित झाल्याचे त्यात म्हटले आहे. सर्वाधिक तक्रारी आयआरसीटीसी वेबसाइटवर दाखल झाल्या आहेत, तर 28 टक्के तक्रारी मोबाइल अॅपशी संबंधित आहेत. अॅप वापरण्याचा प्रयत्न करताना, वापरकर्त्यांना एक मेसेज आला की, देखभाल क्रियाकलापांमुळे ऑपरेशन्स करता येत नाहीत. यावरुन प्लॅटफॉर्म वापरताना समस्या होत्या, हे स्पष्ट होते. आतापर्यंत, आयआरसीटीसीने या प्रकरणावर कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही किंवा त्याच्या निराकरणासाठी कोणतीही मुदत दिली नाही.
सेवेतील व्यत्ययाव्यतिरिक्त, आयआरसीटीसी शेअर्समध्ये देखील ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला सुमारे 1 टक्क्यांची घसरण झाली. गेल्या आठवड्यात, स्टॉक सुमारे 4 टक्क्यांनी घसरला आहे आणि स्टॉकने 2024 मध्ये गुंतवणूकदारांसाठी 10 टक्क्यांहून अधिक नकारात्मक परतावा दिला आहे.
आयआरसीटीसी आउटेजची ही पहिलीच घटना नाही, प्लॅटफॉर्मला याअगोदरही अशा समस्यांचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे ट्रेन तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वापरकर्त्यांना खूप त्रास झाला. सध्याच्या व्यत्ययामुळे, आयआरसीटीसीचे वापरकर्ते आणि गुंतवणूकदार सारखेच कंपनीच्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचे चित्र आहे.