For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत ‘ड’ची पडझड, अक्षर पटेलची अष्टपैलू चमक

06:00 AM Sep 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत ‘ड’ची पडझड  अक्षर पटेलची अष्टपैलू चमक
Advertisement

प्रतिनिधी/नवी दिल्ली

Advertisement

अनंतपूर येथे गुरुवारी दुलीप ट्रॉफी सामन्याच्या पहिल्या दिवशी अष्टपैलू अक्षर पटेलने डळमळीत सुऊवातीनंतर 86 धावा करत भारत ‘ड’ संघाला पुनरागमन करण्यास मोलाची मदत केली आणि त्यानंतर भारत ‘क’चे दोन महत्त्वपूर्ण बळी मिळविले. भारत ‘ड’ संघाला सुऊवातीलाच संघर्ष करावा लागून सहा बाद 48 धावा असा डाव कोसळला होता. पण अक्षरच्या प्रयत्नांमुळे त्यांची एकूण धावसंख्या 164 वर पोहोचली. खेळ थांबला तेव्हा भारत ‘क’ संघ 4 बाद 91 धावा अशा स्थितीत आणि 73 धावांनी पिछाडीवर होता.

भारत ‘क’ची वेगवान जोडी अंशुल कंबोज (2/47) आणि विजयकुमार वैशाख (3/19) यांनी भारत ‘ड’च्या वरच्या फळीला फारसा प्रतिकार करू दिला नाही आणि खेळपट्टीचा फायदा व्यवस्थित उठविला. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अक्षरने आपल्या डावाची सावधपणे सुऊवात केली, परंतु नंतर आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला. त्याने 118 चेंडूंत 86 धावा केल्या आणि भारत ‘ड’चा डाव 48.3 षटकांत आटोपला.

Advertisement

त्यानंतर वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या सुऊवातीच्या यशामुळे भारत ‘क’च्या डावाला खीळ बसली. त्यात अक्षरने आर्यन जुयल (12) आणि रजत पाटीदार (13) यांना बाद करून त्यांचा वेग आणखी कमी केला. भारत ‘क’चा यष्टीरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेलने मात्र नाबाद 32 धावा करताना लवचिकता दाखवली. खेळ थांबवण्यात आला तेव्हा 14 धावांवर असलेल्या बाबा इंद्रजीतसमवेत तो क्रीझवर होता.

त्यापूर्वी भारत ‘ड’च्या डावात अक्षरचे वर्चस्व दिसून आले. कारण त्याने सहा षटकार खेचले. विशेषत: डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुतारला त्याने लक्ष्य केले. श्रेयस अय्यरसारख्या (9) प्रमुख फलंदाजाला वैशाखने स्वस्तात बाद केल्याने भारत ‘ड’च्या अडचणीत भर पडली. सलामीवीर अथर्व तायडेने (4) डावाच्या सुऊवातीला पूल शॉटचा हाणण्याचा केलेला प्रयत्न अंगलट येऊन तो फाइन लेगवर झेलबाद झाला. देवदत्त पडिक्कल (0) देखील लवकर बळी पडला. वैशाखच्या चेंडूवर भारत ‘क’चा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने त्याचा कव्हरवर झेल घेतला.

संक्षिप्त धावफलक: भारत ‘ड’ 48.3 षटकांत सर्व बाद 164 (अक्षर पटेल 86, विजयकुमार वैशाख 3/19).

Advertisement
Tags :

.