बुमराहच्या तंदुरुस्तीवर साशंकता
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहच्या तंदुरुस्तीवर सांशकता व्यक्त केली जात आहे. भारतीय क्रिकेट संघ ऑगस्ट महिन्यात लंकेच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यामध्ये उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. मात्र बुमराहचा या मालिकेसाठी विचार त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून राहील.
भारत आणि लंका यांच्यातील पहिली कसोटी 15 ऑगस्ट रोजी गॅले येथे तर दुसरी कसोटी कोलंबोत 23 ऑगस्टपासून खेळविली जाणार आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वनडे मालिकेतीवल शेवटच्या सामन्यात खेळताना बुमराहच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला ही दुखापत झाली होती. अद्याप या गुडघ्याला बरीच सूज असल्याचे सांगण्यात आले. भारतीय संघ 4 ऑगस्ट रोजी लंकेत दाखल होईल. यानंतर भारताचा चार दिवसांचा सरावाचा सामना कोलंबोमध्ये खेळविला जाणार आहे. लंकन दौऱ्यासाठी अष्टपैलु रविंद्र जडेजा संघात दाखल होण्यासाठी उत्सुक आहे. जडेजा मात्र या दौऱ्यापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगण्यात आले आहे.