आयटीआर भरणाऱ्यांची संख्या दुप्पट
मागील 10 वर्षांमधील स्थितीची आकडेवारी : वाढीसह संख्या 7.78 कोटीवर : सीबीडीटीची माहिती
नवी दिल्ली :
देशात प्राप्तिकर भरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आयकर रिटर्न भरणाऱ्या लोकांची संख्या मागील 10 वर्षात दुपटीने वाढून 7.78 कोटी झाली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) मंगळवारी महत्त्वाची आकडेवारी जाहीर करताना, 2022-23 या आर्थिक वर्षात 7.78 लाख आयकर रिटर्न भरले गेल्याची माहिती सादर केली आहे.
काय म्हणाले सीबीडीटी?
2013-14 मध्ये दाखल केलेल्या 3.8 कोटी आयकर रिटर्नपेक्षा ही आकडेवारी 104.91 टक्के अधिक असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे. याच कालावधीत, निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 2022-23 मध्ये 160.52 टक्क्यांनी वाढून 16,63,686 कोटी रुपये झाले, जे 2013-14 मध्ये 6,38,596 कोटी रुपये होते. सरकारने 2023-24 च्या अर्थसंकल्पात प्रत्यक्ष कर (वैयक्तिक आयकर आणि कंपनी कर) मधून 18.23 लाख कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रत्यक्ष कर संकलन वाढल्याची नोंद आहे.
गेल्या आर्थिक वर्षात जमा झालेल्या 16.61 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण 9.75 टक्के अधिक आहे. सीबीडीटी डेटानुसार, 2022-23 मध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलन 173.31 टक्क्यांनी वाढून 19,72,248 कोटी रुपये झाले जे 2013-14 या आर्थिक वर्षात 7,21,604 कोटी रुपये होते. यासह, प्रत्यक्ष कर-जीडीपी गुणोत्तर 5.62 टक्क्यांवरून 6.11 टक्के झाले. तथापि, संकलन खर्च 2013-14 मधील 0.51 टक्क्यांवरून 2022-23 मध्ये 0.57 टक्के झाला.