मिरज :
मिरज तालुक्यातील सोनी गावात कौटुंबिक वादातून बाप-लेकाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सोनी-भोसे रस्त्यालगत असलेल्या शेतात ही दुर्दैवी घटना घडली. आत्महत्या केलेल्यांची नावे गणेश हिंदुराव कांबळे (वडील) आणि त्यांचा मुलगा इंद्रजीत गणेश कांबळे (वय २२) अशी आहेत.
इंद्रजीतचा विवाह अवघ्या महिनाभरापूर्वी म्हणजेच ८ जून रोजीच झाला होता. मात्र, त्याला लग्नानंतरही वधू पसंत नव्हती. "मला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचं आहे," असे तो सतत सांगत होता. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून घरात सातत्याने वाद सुरू होते. लग्नानंतर कोणतेही विधी जसे की सत्यनारायण पूजा, स्वागत समारंभ झाले नव्हते. गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही.
शुक्रवारी सकाळी गणेश कांबळे नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. त्यांनी द्राक्षबागेवर फवारणीसाठी ठेवलेले विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. वडिलांच्या आत्महत्येची बातमी मिळताच, त्याच शेतात मुलगा इंद्रजीतही होता त्याने कोणतेही कारण न पाहता तेच विषारी औषध घेतले. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
या दुहेरी आत्महत्येमुळे सोनी गावावर शोककळा पसरली असून, एकाच कुटुंबातील बाप-लेकाच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच घडलेल्या या घटनेने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. मिरज ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.