शेतात काडीकचरा जाळल्यास दुप्पट दंड
न्यायालयाचा निर्देश : केंद्राचा निर्णय
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर केंद्र सरकारने शेतात काडीकचरा जाळणाऱ्या शेतकऱ्यांना ठोठावण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम दुप्पट केली आहे. पर्यावरण मंत्रालयाने गुरुवारी अधिसूचना जारी करत याची माहिती दिली आहे. याप्रकरणी आता 2 एकरपेक्षा कमी शेतात काडीकचरा जाळण्यात आल्यास 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. 2-5 एकरापर्यंतच्या शेतजमिनीकरता 10 हजार रुपये तर पाच एकरपेक्षा अधिक शेतजमीन असल्यास 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली सरकारवर संबंधित नियम लागू करण्याचे बंधन असणार आहे. मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हरियाणा सरकारच्या उपाययोजनांवर नाराजी व्यक्त केली होती. आम्हाला कठोर आदेश देण्यासाठी भाग पाडू नका असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.