महाराष्ट्रास सुवर्णचा दुहेरी मुकुट
34 वी किशोर व किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा
वृत्तसंस्था/ सिमडेगा, झारखंड
पुष्पुर येथील अलबर्ट एक्का स्टेडियमवर झालेल्या 34 व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघाने विजेतेपद पटकावित दुहेरी मुकुट संपादिला. किशोर गटाचे सलग 9 वे तर किशोरी गटाचे 7 वे विजेतेपद आहे. साताराचा प्रसाद बळीप सर्वोत्कृष्ट खेळाडूचा भरत पुरस्काराचा तर सांगलीच्या वेदिका तामखडे ही इला पुरस्काराची मानकरी ठरली.
महाराष्ट्र विरुद्ध तेलंगणा हा मुलांचा अंतिम सामना अतिशय अटीतटीचा झाला.
मध्यंतराला 1 गुणांनी पिछाडीवर असलेल्या महाराष्ट्र संघाने 24-15 असा सामना जिंकला. महाराष्ट्र संघाकडून भीमसिंग वसावे 2.00 मी. व1 गडी, श्री दळवी 1.10, 0.50 मी. व 1 गडी, प्रसाद बळीप 1.00, 2.00 मी. व 3 गडी, सचिन थोरात 1.10, 1.00 मी. व 1 गडी, विनायक भांगे 1.20 मी. अशी सांघिक कामगिरी बजावली.
किशोरी गटातही महाराष्ट्राची बाजी
महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने 18 गुणांनी सहज विजय मिळवला. मध्यंतराला 14-4 अशी आघाडी घेत महाराष्ट्रने 26-8 असा सामना जिंकला. महाराष्ट्र संघाकडून वेदिका तामखडेने पहिल्या पाळीत 5 मिनिटे संरक्षण केले. तिला सिद्धी भोसले 1.30 मी. 3.50 मी व 5 गडी बाद करत मोलाची साथ दिली. श्रावणी तामखडेने नाबाद 3.00 मी. संरक्षण करताना 2 गडी बाद केले तर गौरी जाधवने 3 गडी बाद केले.