बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला ‘दुहेरी मुकुट’
भारतीय पुरुष व महिला संघांचे ऐतिहासिक यश, शेवटच्या फेरीत स्लोव्हेनिया, अझरबैजानवर मात
वृत्तसंस्था/ बुडापेस्ट
रविवारी भारताचा पुरुष व महिला संघाने नवा इतिहास रचताना येथे झालेल्या 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली. शेवटच्या 11 व्या फेरीत दोन्ही संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदवत पहिल्यांदाच सुवर्णयश मिळविले. पुरुष संघाने स्लोव्हेनियाचा पराभव केला. त्यात डी गुकेश, अर्जुन एरिगेसी, आर. प्रज्ञानंद यांनी विजय मिळविले तर महिला संघाने अझरबैजानचा 3.5-0.5 अशा गुणांनी पराभव केला.
भारताच्या पुरुष संघाने यापूर्वी 2014 व 2022 मध्ये कांस्य मिळविले तर महिला संघाने 2022 मध्ये कांस्य मिळविले होते. ग्रँडमास्टर आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील आव्हानवीर गुकेशने व्लादिमीर फेडोसेव्हचा पराभव केला, तर एरिगेसीने जान सुबेल्जवर मात केली. त्यानंतर प्रज्ञानंदने अॅटन डेमचेन्कोवर मात करीत 3-0 अशी आघाडी घेत जेतेपद निश्चित केले. भारताने 22 पैकी 21 गुण मिळविताना उझ्बेकिस्तान वगळता प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला हरविले. उझ्बेकची लढत 2-2 अशी बरोबरीत राहिली होती.
महिला विभागातही भारताने जेतेपद पटकावत भारताला एक प्रकारे ‘दुहेरी मुकुट’च मिळवून दिला. डी. हरिकाने सर्वोत्तम प्रदर्शन करीत विजय साकार केला तर दिव्या देशमुखने आपल्या प्रतिस्पर्धी नमवत वैयक्तिक सुवर्ण निश्चित केले. आर. वैशालीने आपला सामना बरोबरीत सोडविल्यानंतर वंतिका अगरवालने चमकदार विजय मिळवित भारताचे सुवर्णपदकही मिळवून दिले.
अमेरिका, चीनवर मात
तत्पूर्वी, 10 व्या फेरीत भारताच्या पुरुष संघाने प्रथम क्रमांकावर असलेल्या अमेरिकेचा 2.5-1.5 असा पराभव केला. तर महिला संघाने चीनचा 2.5-1.5 असा पराभव पत्करून विजयी मार्गावर पुनरागमन केले. खुल्या विभागात दहाव्या फेरीत डी. गुकेश आणि अर्जुन एरिगेसी यांनी आपली दमदार धाव सुरू ठेवली. गुकेशने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या फॅबियानो काऊआनाचा पराभव केला, तर अर्जुनने लेनियर डोमिंग्वेझ पेरेझ याला पराभूत केले. दोघेही पांढऱ्या सोंगट्या घेऊन खेळत होते.
जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या गुकेशने जागतिक स्पर्धेतील माजी आव्हानवीर काऊआनाविरुद्ध सुंदर खेळ केला. 18 वर्षीय भारतीय खेळाडूने काऊआनाला चुकीच्या चाली करण्यास भाग पाडले आणि शेवटी 46 चालींमध्ये त्याचे विजयात रूपांतर केले. दुसरीकडे अर्जुन पेरेझविऊद्ध सुऊवातीपासूनच चांगल्या स्थितीत राहिला. अर्जुनने त्याचा फायदा उठवत आपल्या विजयासह भारताला दोन गुण मिळतील याची खात्री केली. आर. प्रज्ञानंदला मात्र वेस्ली सोकडून पराभव पत्करावा लागला.
विदितनेही मजबूत खेळ केला आणि त्याने त्याचा प्रतिस्पर्धी लेव्हॉन अॅरोनियनला कोणतीही संधी मिळवू दिली नाही. हा सामना बरोबरीत संपला आणि पुऊष संघाने या विजयासह सुवर्णपदकाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले. चीनने उझबेकिस्तानवर मिळवलेल्या विजयामुळे बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या खुल्या विभागात सुवर्णपदकासाठीच्या शर्यतीचा निकाल शेवटच्या फेरीत लागणार हे जरी निश्चित झाले, तरी भारताची मजबूत स्थिती पाहता ते सुवर्णपदक गमावण्याची शक्यता नाही हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. दहाव्या फेरीच्या अंती भारताकडे 19 गुण, तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनकडे 17 गुण होते.
महिला विभागात दिव्या देशमुख पुन्हा एकदा भारतीय संघाच्या मदतीसाठी आली. तिच्या निर्णायक विजयाने भारताला सुवर्णपदकाच्या शर्यतीत ठेवले, तर इतर तीन सामने अनिर्णित राहिले. दिव्याचा नी शिकूनवरील विजय हा तिचा स्पर्धेतील सातवा विजय ठरला. हरिका द्रोणावल्ली, वंतिका अग्रवाल आणि आर. वैशाली यांचे सामने बरोबरीत राहिले होते.