नितीश यांच्यासाठी दरवाजे खुले : मीसा भारती
राजकारणात काहीच अशक्य नाही
पाटणा :
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासंबंधी राजद सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या कन्या आणि खासदार मीसा भारती यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राजकारणात काहीच अशक्य नाही. मकर संक्रातीनंतरच शुभकार्ये सुरू होतात. नितीश कुमार यांच्यासाठी नेहमीच राबडी निवासस्थानाचे दरवाजे खुले आहेत, असे मीसा भारती यांनी म्हटले आहे. तर मीसा यांचे बंधू आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्याशी हातमिळवणी म्हणजेच स्वत:च्या पायांवर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखे ठरेल, असे वक्तव्य केले होते.
बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. यापूर्वीही मकर संक्रांतीनंतर राजकीय उलथापालथ झाली आहे. राजकारणात काहीच अशक्य नाही. परंतु सध्या काही सांगणे घाईचे ठरणार आहे. विधानसभा निवडणूक नजीक आली आहे. आमच्या निवासस्थानाचे दरवाजे नितीश यांच्यासाठी सदैव खुले आहेत, असे मीसा भारती यांनी म्हटले आहे.