For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्याच्या पर्यावरणाबाबत हयगय नको

12:06 PM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोव्याच्या पर्यावरणाबाबत हयगय नको
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा : पर्यावरण दिन कार्यक्रमात पुरस्कार प्रदान 

Advertisement

पणजी : गोवा स्वच्छ आणि हरित करण्यासाठी सरकार विविध प्रकारचे उपक्रम राबवित आहे. उद्योग कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात उपक्रम राबविले आहेत. परंतु ज्यांच्याकडे एफिशियंट ईटीपी जर नसेल तर कंपनी बंद करावी लागेल. कंपन्यांनी सांडपाणीवर ईटीपीमध्येच  प्रक्रिया करणे आवश्यक आहे. गोव्याच्या पर्यावरणाबाबत कुठल्याही प्रकारची हयगय सहन करण्यात येणार नाही. याशिवाय घरातील कचरा आणून रस्त्यावर टाकू नका. याशिवाय हॉटेलवाल्यांनीदेखील कचरा रस्त्यावर टाकू नये. अशाप्रकारची कृत्ये खपवून घेण्यात येणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे.पर्यावरण खाते, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि गोवा राज्य जैवविविधता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मॅकेनिज पॅलेस येथे आयोजित केलेल्या जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री बोलत होते.

व्यासपीठावर सन्माननीय अतिथी म्हणून पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, विशेष अतिथी म्हणून जीआयडीसीचे अध्यक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड, फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाचे माजी संचालक देवेंद्र पांडे आयएफएस, मुख्य सचिव पुनित कुमार गोयल, प्रधान सचिव डॉ. व्ही चंदव्हेलू, पर्यावरण खात्याचे संचालक जॉनसन फर्नांडिस, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक महेश पाटील उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाचे ‘आपली जमीन आपले भविष्य’हे घोषवाक्य असून जमीन पुनरूज्जीवन, दुष्काळ आणि वाळंवटीकरण ही थीम होती.

Advertisement

बांबु लागवडीला प्रोत्साहन

सध्या समुद्रकिनारी तसेच नदीकिनारीदेखील मातीची धूप झालेली मोठ्या प्रमाणात दिसून येते. या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे बांबूची लागवड व काजू लागवड यंदापासून सुरू करण्यात येणार आहे. सध्या गोव्यात 9 प्रकारचे बांबू उपलब्ध आहेत. व्यावसायिकदृष्ट्या बांबू लावून पाच वर्षात विकत घेण्याची आणि विक्री करण्याची तरतूद सरकारतर्फे करण्यात आली आहे. यंदा 1 लाख बांबू देण्याचा प्रयत्न असेल. जून, जुलै, ऑगस्ट हे तीन महिने वनखाते व कार्यालयात बांबू व काजू उपलब्ध असतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

पंचायतींना अतिरिक्त निधी

मेणकुरे पंचायत आणि डोंगुर्ली ठाणे सत्तरी पंचायतीने घनकचरा व्यवस्थापनाबाबत कौतुकास्पद कार्य केले. चांगले कार्य करत असल्यामुळे या पंचायतींना अतिरिक्त निधी देण्याची तरतूद सरकारतर्फे करण्यात येणार आहे. भविष्यात उर्वरित पंचायतींनी अशाप्रकारे कार्य करावे. पुढील वर्षी प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे पंचायतीमध्ये घनकचरा व्यवस्थापन कशाप्रकारे करण्यात येते त्याबाबत तपासणी करण्यात येणार याशिवाय त्यांना बक्षिस म्हणून अतिरिक्त निधी देण्याचीही तरतूद करण्यात येणार आहे. सुर्ला ग्रामपंचायतीने 20 वर्षांपूर्वीची पडीक जमिनीला सुपिक जमीन बनविले. अटल ग्राम योजना आणि स्वयंपूर्ण गोवा या योजनेच्या सहकार्याने सुर्ला ग्रामपंचायतीने 31 हेक्टर शेतजमीन पडीक होती. परंतु या दोन्ही योजनेचा वापर करून ही जमीन सुपिक बनविली. अशाप्रकारचे उपक्रम घेतल्यास पारंपरिक गोष्टी पुनरूज्जीवित होऊ शकतात, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी पर्यावरण दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या काही स्पर्धा तसेच पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले. ईपी बायोकम्पेसिट लिमिटेडतर्फे आयोजित ‘द प्लॅनेट केअर इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेत प्रथम : ऋषिकेश खेडेकर द्वितीय : रेयांश वालावलकर, 20 वर्षापासून बंद असलेल्या पुरण शेतीचा प्रकल्प सुरू केल्यामुळे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रकाश पर्येकर, गणेश पर्येकर व विठोबा पिंगळे यांचा सत्कार करण्यात आला. सांडपाणी व्यवस्थापनाबाबत उपक्रम राबविल्याप्रकरणी मेसर्स नेस्ले इंडिया लिमिटेड, अलिला दिवा गोवा, डेक्कन फाईन केमिकल्स, सिप्ला लिमिटेड या कंपन्यांना उत्कृष्ट कंपनी म्हणून पुरस्कार देण्यात आला. उत्कृष्टरित्या घनकचरा व्यवस्थापनाबाबत उत्तम कामगिरी केल्याबद्दल ग्रामपंचायत मेणकुरे, आणि ग्रामपंचायत डोंगुर्ली ठाणे यांचा गौरव करण्यात आला. 31 हेक्टर पडीक जमिनीला सुपिक बनविण्याचे कार्य ग्रामपंचायत सुर्ला डिचोलीने केल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. हरित इमारतीचा जीएमआर गोवा आणि नानुटेल यांना पुरस्कार मिळाला. तसेच इतर स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत महेश पाटील यांनी केले. यावेळी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा वार्षिक अहवाल 2023-24 प्रकाशित करण्यात आला.

Advertisement
Tags :

.