अस्वच्छता करणारे पर्यटक नकोच
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांची कडक भूमिका : अशा पर्यटकांमुळे गोव्याची होतेय बदनामी
पणजी : गॅस सिलिंडर, स्टोव्ह आणि पातेली घेऊन पर्यटन करायचे असेल तर गोव्यात येऊच नका. यायचेच असेल तर सभ्यतेने या आणि सभ्य वागा. आम्हाला असभ्य पर्यटक नकोत. अन्यथा तुमचे साहित्य सीमेवरच जप्त करण्यात येईल, अशी सक्त ताकीद मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. राज्यात आजपासून पर्यटनाच्या नवीन पर्वाला प्रारंभ होत असून आदर्श आणि सभ्य पर्यटकांचेच स्वागत करण्यात येईल. गॅस सिलिंडर, स्टोव्ह आणि पातेली घेऊन येणाऱ्या व रस्त्याच्या कडेला वाहने थांबवून तेथेच रांधून जेवणाऱ्या पर्यटकांना गोवा स्वीकारणार नाही. असे पर्यटक दिसल्यास त्यांचे संबंधित सर्व साहित्य जप्त करण्यात येईलच, त्याशिवाय ज्या बस किंवा अन्य वाहनातून ते आलेले असतील त्याचा मालक वा वाहक यांच्यावरही दंडात्मक कारवाई होईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
सर्वत्र घाण, कचऱ्याचे वातावरण
हल्लीच्या काही वर्षांमध्ये असे स्वस्तातले देशी पर्यटक गोव्यात वाढू लागले आहेत. हे लोक केवळ दोन ते तीन दिवसांसाठी स्वत:च्या वाहनांतून येतात. त्यावेळी वाटेतच कुठेतरी, जास्त करून पाण्याचा नैसर्गिक स्रोत असलेल्या ठिकाणी वाहने थांबवून तेथेच आंघोळ करतात, अन्न शिजवतात आणि जेवण उरकतात. शिल्लक अन्न, उष्टे खरकटे तेथेच टाकतात आणि पुढच्या प्रवासाला निघतात. त्यातून सर्वत्र घाण, कचरा पसरविला जातो.
गोव्याचे आंsघळण्वाणे चित्र नकोच
हेच पर्यटक राज्यात आल्याआल्या सर्वप्रथम समुद्रकिनाऱ्यांकडे धाव घेतात आणि तेथे वावरतानाही स्वत:मधील असभ्यतेचेच दर्शन घडवतात. अशा लोकांमुळे उच्चभ्रू, सभ्य पर्यटकांच्या नजरेतून गोव्याबद्दल ओंगळवाणे चित्र निर्माण होते. त्याची देशभरात चर्चा होते व बदनामीही होते. परिणामी चांगले पर्यटक गोव्याकडे येण्यास कचरतात. असे प्रकार राज्याच्या पर्यटनासाठी मारक ठरत आहेत. त्यामुळे अशा पर्यटकांना यापुढे राज्यात थारा देण्यात येणार नाही. पोलिसांकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यानी सांगितले.
भिकारी, टाऊटस्, मसाजवाल्यांना बंदी
त्याही पुढे जाताना भिकारी, विविध प्रकारच्या वस्तू विक्री करणारे विक्रेते, मसाज करणारे लोक, एजंट (टाऊट्स) यांच्यावर किनारपट्टीवर फिरण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. यापुढे त्यांना समज, सूचना देऊन सोडण्यात येणार नाही, तर तुऊंगवासाची शिक्षा देण्यात येईल.
वक्फ विधेयकाचा गोव्यात परिणाम नाही
संसदेत मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा विधेयकाचा गोव्यावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण गोव्यात वक्फ किंवा अशा बोर्डाची कोणतीही मालमत्ता नाही. त्यामुळे गोमंतकीयांमधील एकोपा भविष्यातही असाच कायम राहील, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही वर्षांपासून वक्फ बोर्डाकडून देशातील हजारो ठिकाणच्या मालमत्तांवर दावे करण्यात आले आहेत. त्यामुळेच यासंदर्भातील कायद्यात दुऊस्ती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला व सदर विधेयक मंजूरही केले. त्यासाठी आपण समाधान व्यक्त करतो व केंद्र सरकारचे आभार मानतो आणि निर्णयाचे स्वागत करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
हा कायदा म्हणजे देश आणि त्याच्या संविधानाचा विजय आहे. ‘भारत जिंकला आहे. भारताचे संविधान जिंकले आहे’! असेही ते पुढे म्हणाले. सरकारचा हा निर्णय कोणत्याही धर्माविरोधात नाही. तर गरीब मुसलमानांच्या हितासाठी सरकारने पुढाकार घेऊन ते विधेयक मंजूर केले आहे. त्यामागे देशहिताचाच विचार आहे. केंद्र सरकार केवळ विधेयक मंजूर करूनच थांबलेले नाही तर इतिहासात प्रथमच वक्फ बोर्डावर महिलांची नियुक्ती करण्याचाही निर्णय घेऊन महिलांनाही न्याय मिळवून दिला आहे. नवीन कायद्यामुळे वक्फ बोर्डमध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि समावेशक प्रतिनिधित्व वाढीस लागेल व कार्यक्षम व्यवस्थापन सुनिश्चित होणार आहे. त्यामुळे गोव्यातील मुस्लिम धर्मियांनी या विधेयकाचे स्वागत करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.