मला खासदार व्हायचं नाही...मी अजून दोन टर्म आमदारकी लढवणार..हसन मुश्रीफ
मला खासदार व्यायचं नाही...मी अजून दोन विधानसभा निवडणूका लढवणार असल्याचा खुलासा मंत्री हसन मुश्रिफ यांनी केला आहे. तसेच मनोज जरांगे आणि छगन भुजबळ दोघांनी आरक्षणाचा मुद्दा जास्त न ताणता समाजासाठी त्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा असे अवाहन केले आहे.
कोल्हापूरात आज बोलताना हसन मुश्रीफ यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. ते म्हणाले, "ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भुजबळांची भूमिका आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषण आणि आंदोलनामुळे कुणबी दाखले मराठ्यांना मिळाले आहेत. यामुळे भुजबळ आणि जरांगे- पाटील या दोघांनीही हे प्रकरण जास्त न ताणता समाजाच्या भल्याचा निर्णय घ्यावा." असे आवाहन केले आहे.
जरांगे- पाटील याबरोबर झालेल्या बैठकीवर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, "ज्यांचे निजाम काळापासून कुणबी दाखले असतील त्यांची नोंद शिंदे समितीच्या वतीने युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे शासन मराठ्यांना फसवत असल्याचा प्रश्नच येत नाही. तसेच कालची चर्चा जर फिस्कटली असेल तर आम्ही पुन्हा चर्चा करू. पण शासन आपले प्रयत्न सोडणार नाही व मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही."असा आश्वासन त्यांनी दिले.
लोकसभेच्या उमेदवारीबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, "संसदेत नक्की नक्की काय झालयं हे मला माहित नाही. मी अजून दोन विधानसभा लढणार आहे. मला अजून कागल तालुक्याच्या जनतेशी सेवा करायची आहे."असा खुलासा त्यांनी केला.