महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खेळात राजकारण नकोच

06:29 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गेला बुधवार हा भारतातील सर्व क्रीडाप्रेमींसाठी दु:खाचाच ठरला. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिचे कुस्तीच्या 50 किलो गटातील ऑलिंपिक स्पर्धेचे निश्चित झालेले रौप्यपदक किंवा संभाव्य सुवर्णपदक त्यादिवशी हुकले. कारण, अंतिम फेरीच्या आधी तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम अधिक भरले आणि तिला नियमानुसार अपात्र ठरविण्यात आले. यामुळे ती अंतिम फेरी तर खेळू शकली नाहीच, पण रौप्य पदकही हाती लागले नाही. तिचा या गटात शेवटचा क्रमांक लावण्यात आला. या तांत्रिक कारणाने तिला आणि भारताला एका पदकापासून वंचित राहावे लागले. याचे दु:ख सर्वांना होणे स्वाभाविकच होते. तथापि, हे पदक गमावल्याच्या दु:खापेक्षाही या घटनेचे राजकारण करण्याचा जो प्रयत्न केला जात आहे तो अधिक क्लेषकारक आहे. विरोधी पक्ष या घटनेसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या शरसंधान केले जात आहे. काही काळापूर्वी काही भारतीय कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती संघटनेचे त्यावेळचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात मोठे आंदोलन चालविले होते. या आंदोलनात विनेश फोगटही सहभागी होती. या साऱ्या घटनांचा संदर्भ तिचे ऑलिंपिक पदक हुकल्याच्या घटनेशी जोडून केले जात असलेले राजकारण योग्य आहे असे वाटत नाही. कटकारस्थानाचा आरोप तर अतिरंजित आणि काल्पनिक असल्याचे घटनाक्रम पाहता दिसते. यासंबंधी जी अनेक वृत्ते प्रसिद्ध होत आहेत, त्यांचा आढावा घेता असे दिसते की या खेळाडूचे नैसर्गिक वजन 57 किलो होते. तथापि, तिने ते 53 किलोपर्यंत कमी केले होते आणि काही स्पर्धा ती 53 किलो गटात खेळली आणि जिंकलीही होती. मग तिला 50 किलो गटात का खेळविण्यात आले, असा प्रश्न विचारला जात आहे. यामध्ये काही जणांना कारस्थान असल्याची शक्यता वाटत आहे. तथापि, विनेश फोगटसारख्या मान्यवर आणि अनुभवी कुस्तीपटूवर तिला अनुकूल नसलेल्या गटात खेळण्याची सक्ती कोणी करु शकेल काय? अशी सक्ती तिने मान्य कशी केली असती? जी कुस्तीपटू केंद्र सरकारविरोधात आंदोलन करु शकते, ती अशा सक्तीसमोर मान तुकविण्याइतकी कमजोर असू शकेल काय? अशी सक्ती झालीच असती तर तिने त्याचवेळी, म्हणजे

Advertisement

ऑलिंपिक स्पर्धेचा प्रारंभ होण्यापूर्वीच या सक्तीविरोधात आवाज उठविला नसता काय? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात. स्वत: विनेश किंवा तिचे पती किंवा तिचे कुस्तीपटूच राहिलेले वडील आणि काका यांनी कोणीही तिच्यावर कमी वजन गटात खेळण्याची सक्ती झाल्याचा आरोप केलेला नाही, ही बाबही महत्त्वपूर्ण ठरते. इतकेच नव्हे, तर तिच्या प्रत्यक्ष काकांनीच वृत्त माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत, ‘तिचे पदक हुकणे दुर्दैवी असले, तरी या घटनेचे कोणीही राजकारण करु नये,’ असे आवाहन केले आहे. तसेच या घटनाक्रमात कटकारस्थान असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केलेली नाही. पुढचा महत्त्वाचा मुद्दा चर्चिला जात आहे, तो असा की, ऑलिंपिक स्पर्धेचा प्रारंभ झाल्यानंतर पॅरिसमध्ये काही कारस्थान घडले आहे काय? पण तीही शक्यता वाटत नाही. कारण तिला तिचा व्यक्तीगत सहकारीवर्ग निवडण्याची पूर्ण मुभा देण्यात आली होती. प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, फिजिशियन, डॉक्टर हे सर्वजण तिने स्वत: निवडलेले, म्हणजेच तिच्या विश्वासातले होते. तसेच प्रत्यक्ष तिचे पतीही पूर्णवेळ तिच्या समवेत होते. अशा स्थितीत तिथे तिच्या विरोधात कोणी कारस्थान केले असण्याची शक्यताच नाही. स्पर्धेच्या आधी 40 दिवस तिच्या इच्छेनुसार तिला हंगेरी या देशात प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. त्याहीवेळी तिच्या समवेत तिने निवडलेलेच तिचे सहकारी होते. तिने प्रयत्नपूर्वक आपले वजन 50 किलोपेक्षा थोडे कमी ठेवले होते. उपांत्य फेरीच्या वेळी तिचे वजन 49 किलो 900 ग्रॅम, म्हणजेच अधिकतम मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम कमी होते, असे वृत्तही प्रसिद्ध झालेले आहे. तथापि, अंतिम फेरीच्या आधी या वजनात काहीही वाढ होऊन ते तिच्या गटाच्या मर्यादेबाहेर पोहचले होते. ते कमी करण्यासाठी तिने स्वत: निवड केलेले डॉक्टर परदीवाला यांनी रात्रभर प्रयत्न केले. पण या प्रयत्नांनाही नैसर्गिक मर्यादा असते. ती ओलांडून तिचे वजन कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता तर कदाचित तिच्या जीवालाही धोका होऊ शकला असता. हा सर्व घटनाक्रम आता प्रसिद्ध झाला आहे. तो पाहता कारस्थानाचा आरोप कोणत्याही सुबुद्ध व्यक्तीला न पटण्यासारखाच आहे. अगदी, जेव्हा तिने नैराश्याच्या भरात कुस्ती सोडण्याचा निर्णय घोषित केला, तेव्हाही तिने कोणावरही कसलाही आरोप केलेला नाही, ही बाबही विचार करण्यासारखी आहे. पण अलीकडच्या काळात राजकारण इतके स्पर्धात्मक झाले आहे, की कोणत्याही संवेदनशील घटनेचा संबंध निवडणुकीच्या राजकारणाशी जोडला जातो. ही गळेकापू स्पर्धा कित्येकदा, ती करणाऱ्यांना नव्हे, तर तिच्याशी संबंध नसणाऱ्या निरपराध्यांची हानी करते. येत्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक आहे. यांपैकी महाराष्ट्र आणि हरियाणा ही दोन राज्ये कुस्तीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे विनेशसंबंधीचा हा घटनाक्रम राजकीय हत्यार म्हणून उपयोगात आणला जात असावा. तथापि, आतापर्यंत जी माहिती या संदर्भात उपलब्ध झालेली आहे, तिच्यावरुन हे कटकारस्थान असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसून येत नाही. त्यामुळे आता ‘ती अंतिम फेरीत पोहचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन का केले नाही’ असा नवा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. समजा, त्यांनी अभिनंदन केले असते, आणि नंतर तिचे पदक हुकण्याचा प्रकार घडला असता, तर पुन्हा ‘पनवती लागली’ असा अपप्रचार झालाच असता. कारण 50 षटकांच्या विश्वचषक अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेवटचा दीड तास उपस्थित होते, त्यानंतर पनवतीचा आरोप लागलाच. तसे यावेळीही नक्कीच झाले असते. कारण एकदा राजकारण हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा मानायचा असा निर्धार केला की कोणतीही मर्यादा पाळण्याचे बंधन रहात नाहीत. पण खेळाच्या संदर्भात तरी असे करणे योग्य नव्हे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article