खोट्या आश्वासनांची खैरात करणाऱ्या भाजपवर विश्वास ठेवू नका
काँग्रेस उमेदवार डॉ. अंजली निंबाळकरांच्या प्रचारप्रसंगी मंकाळू वैद्य यांचे आवाहन
कारवार : गेल्या 30 वर्षात भाजपवाल्यांनी खोटे बोलण्याच्या पलीकडे जिल्ह्यासाठी काही केले नाही, अशी टीका कारवार जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य यांनी केली. गुरुवारी कुमठा तालुक्यातील तोरके येथील नाडवर सभागृहात ब्लॉक काँग्रेसच्यावतीने आयोजित कारवार लोकसभा मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारी आणि प्रचारसभेत ते बोलत होते. वैद्य पुढे म्हणाले, विद्यमान खासदारांनी गेल्या 30 वर्षात जिल्ह्यासाठी काय केले हे दाखवून द्यावे. संपूर्ण देशाला उर्जेचा पुरवठा करणाऱ्या कारवार जिल्ह्यासाठी वीज उपलब्ध करून देता आले नाही. भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे केवळ आमदार म्हणूनच नव्हेतर मंत्री म्हणूनही वावरले आहेत. विधानसभेचे सभापती होऊनही त्यांना जिल्ह्याला न्याय मिळवून देण्यात यश आले नाही. पुन्हा अशा नेत्यांच्याकडून अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरेल. खोट्या आश्वासनांची खैरात करणाऱ्या भाजपवर विश्वास ठेवू नका. त्याऐवजी बोले तैसे चाले हे सिद्ध करून दाखविलेल्या काँग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा, असे आवाहन केले. याप्रसंगी काँग्रेस उमेदवार डॉ. निंबाळकर म्हणाल्या, केवळ जात, धर्म, हिंदुत्व, खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजपला त्यांची जागा दाखवून द्या. गरीब, शेतकरी, महिलांसाठी झटणाऱ्या काँग्रेस उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन केले. यावेळी केपीसीसी प्रधान कार्यदर्शी निवेदीता अल्वा, जि. पं. माजी सदस्य प्रदीप नायक, होन्नप्पा नाईक आदींनी डॉ. निंबाळकर यांना निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असे आवाहन केले. साई गांवकर यांनीही काँग्रेस उमेदवार बाजी मारणार, असा विश्वास व्यक्त केला.