For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्क्रॅप टाकू नका, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी ‘सावू’ कडे द्या

04:31 PM Jan 30, 2025 IST | Radhika Patil
स्क्रॅप टाकू नका  गरीब मुलांच्या शिक्षणासाठी ‘सावू’ कडे द्या
Advertisement

कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे : 

Advertisement

घरात अडगळीत पडलेले स्क्रॅप, रद्दी, पुठा असे साहित्य कुठेही फेकून शहर अस्वच्छ करु नका. त्याऐवजी असे साहित्य ‘सावू’ सोशल फाऊंडेशनकडे प्रदान करुन गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाला हातभार लावा असे आवाहन फाऊंडेशनकडून करण्यात येत आहे. संस्थेच्या या आवाहनाला भरभरुन प्रतिसाद मिळत असून उपक्रम सुरु केल्यापासून संस्थेकडे 14 पोती कपडे आणि 250 विविध पाठयपुस्तकांचे संकलन झाले आहे.

समाज प्रगत होत असला तरी अजूनही शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांचे प्रमाण मोठे आहे हे वास्तव आहे. कित्येक मुले शाळेतच जात नाहीत. विद्यार्थ्यांच्या गळतीची संख्या सुध्दा मोठी आहे. गरीब कुटुंबातील कित्येक मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. यामध्ये ऊसतोड आणि वीटभटीवर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांचा समावेश आहे. या मजूरांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून योजना राबवल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे वास्तव आहे. या मुलांना शैक्षणिक साहित्य आणि चांगले कपडेही मिळत नाहीत. यामुळे अशा गरीब मुलांसाठी सावू सोशल फाऊंडेशन आणि एआयएसफतर्फे शैक्षणिक साहित्य देण्याचा उपक्रम राबवला जात आहे.

Advertisement

शैक्षणिक साहित्याच्या संकलनासाठी फाऊंडेशनकडून आवाहन करण्यात येत आहे. घरात अडगळीत पडलेल्या जुन्या वस्तू, स्क्रॅप, रद्दी, फाऊंडेशनकडे देण्यात येत आहेत. या वस्तू आल्यानंतर फाऊंडेशन आणि एआयएसफच्या टीमकडून त्याचे वर्गीकरण केले जाते. यामधून टाकावूतून टिकावू बनवले जाते. यामध्ये पाठ्यापुस्तकेही येतात. ती पुस्तके निवडून जिल्हा परिषद, महापालिकेच्या शाळातील आणि मजूरांच्या मुलांना दिली जाणार आहेत. फाऊंडेशनने उपक्रम सुरु केल्यापासून सुमारे 22 पोती कपड्यांचे संकलन झाले असून ती गरजूंना देण्यात येणार आहेत. तर पाच सायकली आल्या असून त्या सायकलीही गरजू विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. उर्वरित स्क्रॅपची विक्री करुन मिळणाऱ्या रकमेतून शालेय साहित्य देण्यात येणार आहे.

  • व्यसनमुक्तीसाठीही प्रयत्न

सावू’ फाऊंडेशन दुर्लक्षित मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहे.पण सद्या सातवी- आठवीपासूनच मुले व्यसनाधीनतेकडे वळू लागली आहेत. सुदृढ समाज निर्मितीसाठी ही व्यसनाधीनता हानीकारक आहे. विशेषत: झोपडपट्यामध्ये हे प्रमाण अधिक आहे. यामुळे तेथील मुले शिक्षणापासून दूर जावू लागली आहेत.या मुलांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठीही ‘सावू’ फाऊंडेशन प्रयत्न करत आहे.

  • वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी उपक्रमाची सुरुवात

या उपक्रमात लोक जुनी - नवी कपडे, लोखंड, पत्र्याचे डबे, प्लास्टिक, रद्दी, इलेक्ट्रिक साहित्य, काचेच्या बाटल्या, पुठ्ठा, प्लास्टिक पिशव्या, जुनी पुस्तके, वह्या, जुन्या सायकली, जुने शैक्षणिक साहित्य, खेळणी देऊन लोक सहभागी होत आहेत.कोल्हापूर जिह्यातील दुर्गम भागात तसेच शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.भंगार वेचकांच्या पाल्यांना प्रामुख्याने मदत करणार आहोत. या उपक्रमाला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.

                                                                                               प्रशांत आंबी- ‘सावू’सोशल फाउंडेशन

 

Advertisement
Tags :

.