For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताच्या संयमाची परीक्षा पाहू नका!

06:11 AM Jun 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारताच्या संयमाची परीक्षा पाहू नका
Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी अमेरिकेत युवा प्रोफेशनल्सला संबोधित करत पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावरील भारताची प्रतिक्रिया संयमी परंतु निर्णायक ठरविली आहे. शेजारी देशाने पुन्हा आगळीक केल्यास भारत जोरदार प्रत्युत्तर देणार आहे. पहलगाम  हल्ल्यानंतर भारताकडे प्रत्युत्तर देण्याव्यतिरिक्त अन्य पर्यायच नव्हता असेही त्यांनी म्हटले आहे.

आम्ही संयम राखला, परंतु आमच्या सहनशीलतेला मर्यादा असल्याचेही स्पष्ट केले. आम्हाला प्रत्युत्तर द्यावे लागले. हे काही पर्याय नव्हे तर गरज ठरले होते. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाकडे एकजुटतेची मागणी केल्याचे थरूर यांनी स्पष्ट केले.

Advertisement

पाकिस्तानने पुन्हा दहशतवादी हल्ला घडवून आणला तर आम्ही पूर्वीपेक्षा जोरदारपणे प्रत्युत्तर देणार आहोत. आमच्या सहनशीलतेला कमी लेखू नये. भारताचे लक्ष विकास आणि गरीबी दूर करण्यावर आहे, परंतु दहशतवादी हल्ल्यांकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नसल्याचे वक्तव्य थरूर यांनी केले आहे.

भारत शांतता इच्छितो, परंतु जर निर्दोष नागरिकांना मारण्याचा प्रयत्न झाला तर भारत गप्प बसणार नाही. संघर्षावर वेळ खर्च व्हावा असे आम्हाला वाटत नाही, परंतु जेव्हा सीमेपलिकडून येणारे दहशतवादी आमच्या लोकांची हत्या करतात, तेव्हा आम्ही गप्प बसू शकत नाही अशी भूमिका थरूर यांनी मांडली.

थरूर यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवरून ठोस मुद्दे मांडले. इतिहास आणि नकाराचे धोरण हीच पाकिस्तानची जुनी रणनीति आहे. प्रथम हल्ला घडवून आणायचा मग त्याचा दोष नाकारायचा. मुंबई हल्ल्यावेळी पाकिस्तानने असेच केले होते. ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानी सैन्यतळ असलेल्या एबटाबादमध्येच लपून होता, हे देखील पाकिस्तानच्या याच रणनीतिचे उदाहरण आहे. पाकिस्तान जोपर्यंत रंगेहात पकडला जात नाही तोवर स्वत:चे गुन्हे नाकारत राहतो असे थरूर यांनी निदर्शनास आणून दिले.

पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सैन्य आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. याची छायाचित्रे पुरावा म्हणून पुरेशी आहेत. भारत पुराव्यांशिवाय  सैन्य कारवाई करत नाही. मागील वर्षी पाकिस्तानशी संबंधित 24 दहशतवादी हल्ले झाले, परंतु कुणीच मोठ्या प्रत्युत्तराची मागणी केली नाही. परंतु यावेळी स्थिती वेगळी होती. कुठल्याही देशाने भारतीय शिष्टमंडळाकडून पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे मागितले नाहीत, कारण या देशांकडे पूर्वीच विश्वास ठेवण्याजोगी तथ्यात्मक माहिती होती असे थरूर यांनी स्पष्ट पेले.

चीनकडे करता येणार नाही दुर्लक्ष

भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान चीनकडे दुर्लक्ष करता येणार नाही. चीनचे पाकिस्तानात मोठे हितसंबंध आहेत हे आम्ही जाणून आहोत. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह अंतर्गत सर्वात मोठा प्रकल्प चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉरच आहे. तसेच पाकिस्तानकडील 81 टक्के संरक्षण उपकरणे चिनी बनावटीची आहेत. पाकिस्तानला थेट मदत करणे आणि सुरक्षा परिषदेत साथ देण्याप्रकरणी आम्ही अत्यंत वेगळा चीन अनुभवला असल्याचे उद्गार थरूर यांनी काढले. आमच्या शेजारी कोणती आव्हाने आहेत, याबद्दल आम्हाला कुठलाच भ्रम नाही. परंतु भारताने स्वत:च्या विरोधकांसोबत चर्चेचा मार्ग नेहमीच खुला ठेवला असल्याचे ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.