For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

थकीत वीजबिल अध्यक्षांच्या नावे फाडू नका

11:43 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
थकीत वीजबिल अध्यक्षांच्या नावे फाडू नका
Advertisement

गणेशोत्सव महामंडळाची प्रशासनाकडे मागणी : आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा : सोशल मीडियावरील पोस्टवर करडी नजर 

Advertisement

बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे विद्युतबिल मंडळाच्या अध्यक्षांच्या घरगुती मीटरवर वर्ग केले जात असल्यामुळे मंडळाचा अध्यक्ष होण्यास कार्यकर्ते पुढे सरसावत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यापुढील काळात मंडळाच्या अध्यक्षांच्या घरगुती मीटरवर थकीत बिल वर्ग करू नये, अशी महत्त्वाची मागणी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने बुधवारी गणेशोत्सवाबाबत आढावा बैठक कुमार गंधर्व मंदिर येथे पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, उपायुक्त रोहन जगदीश, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. बैठकीमध्ये गणेशोत्सवासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. एक खिडकी योजना लवकर सुरू करावी, कपिलेश्वर उड्डाणपुलावरील खड्ड्यांमध्ये काँक्रीट घालावे, विद्युतवाहिन्यांची उंची वाढवावी, मूर्तिशाळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मुरुम टाकावा, धोकादायक झाडे हटवावीत, उशिरापर्यंत बसवाहतूक व हॉटेल सुरू ठेवावीत, यासह विविध मागण्या जिल्हा प्रशासनाकडे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. अधिकाऱ्यांनी मंडळांच्या मागण्या ऐकून घेत यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले.

सुमोटोअंतर्गत कठोर कारवाई करण्याचा इशारा

Advertisement

सण-उत्सवांच्या काळात सोशल मीडियावर पोस्ट करून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न वारंवार होत आहे. यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होत आहे. अशा पोस्टवर पोलिसांची करडी नजर असून असा कोणताही प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत 30 जणांवर सुमोटोअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून यापुढेही कठोर कारवाई होईल, असा इशारा पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिला. यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, कार्याध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, महादेव पाटील, आनंद आपटेकर, लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, सुनील जाधव, नगरसेवक गिरीश धोंगडी यांच्यासह महानगरपालिका, हेस्कॉम, परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विसर्जनासाठी क्रेनऐवजी एक्सिलेटर बसविण्याचा विचार

बेळगावमध्ये विसर्जनासाठी क्रेनचा वापर केला जातो. परंतु, यावेळी मूर्तीची विटंबना होत असल्याने हा प्रकार थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यावर्षीपासून एक्सिलेटर बसविण्याचा विचार सुरू केला आहे. कोल्हापूरच्या धर्तीवर बेळगावमध्येही एक्सिलेटर बसविल्यास मूर्ती आहे तशी पाण्यामध्ये विसर्जित करता येणार आहे. यासाठी स्थानिक उद्योजकांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.