गोव्याची सुपिक जमीन दिल्लीवासियांना विकू नका
कृषीमंत्री रवी नाईक यांचे कळकळीचे आवाहन
फोंडा : सुशेगाद गोमंतकीय म्हणून आपली ओळख जगभर अबाधित ठेवण्यासाठी राज्यातील वडिलोपार्जित सुपिक जमिनी बिगरगोमंतकीयांना विकू नका ! अशा आपल्या काही वर्षापुर्वीच्या विचारांवर फोंड्याचे पात्राव म्हणून ख्याती असलेले ज्येष्ठ राजकारणी विद्यमान कृषीमंत्री रवी नाईक आजही ठाम आहेत. कृषी खात्याअंतर्गत योजनांचा लाभ घेत सुपिक जमिनी कसून वडिलोपार्जित जमिनीची श्रीमंती आपल्या पुढील पिढीसाठी सांभाळून ठेवा, असे कळकळीचे आवाहन मंत्री नाईक यांनी पुन्हा केले आहे. फोंडा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना गोमंतकीय धनाढ्या बिगरगोमंतकीयांना सर्रास जमिनी विकत असल्याच्या गोष्टीवर मंत्री नाईक यांनी चिंता व्यक्त केली.
जमिनी, शेती-बागायती सांभाळून ठेवणे आमची जबाबदारी आहे. दिल्लीवासियांकडे पैसा अमाप आहे., मात्र शहरात राहण्यासाठी पोषक वातावरण नाही. तेथील धनाड्याही आजाराने ग्रासलेले आहेत. त्यांना आमच्या सुंदर गोव्याचे हवामान खुणावतेय. त्यासाठी पर्यटक म्हणून आलेले अनेक दिल्लीवासीय ‘सेकन्ड होम’ म्हणून गोव्यात जमीन विकत घेण्यासाठी आग्रही आहेत. अनेक फ्लॅटांच्यो मेगा प्रोजेक्ट उभारण्यासाठी गोव्यात दिल्लीतील बिल्डर मोठ्या प्रमाणात येत आहेत. ते बॅगाच्या बॅगा भरुन पैसे घेऊन येतील. त्यांच्या पैशाला बळी पडून आपल्या सुपिक जमिनी विकू नका.
जून महिन्याच्या सुरवातीला कृषी खात्यातर्फे रोपांचे वाटप होणार असून त्याचा लाभ घेत आपली जमीन हिरवीगार करा, असेही नाईक म्हणाले. पर्यटन व्यवसाय हा गोव्यासाठी अंत्यत आवश्यक आहे. मात्र गोव्याची बदनामी करीत येथे कचरा टाकून जाणारे पर्यटक नकोच. वाहने रस्त्यावर उभी करून जेवण करणारे पर्यटकांना कदापि थारा देऊन नये. अशा प्रकारामुळे पर्यटन राज्य असलेल्या गोव्याच्या प्रतिमेला धक्का बसतो. गोमंतकीयांनो अजून वेळ गेलेली नाही, वेळीच सावध व्हा. आपल्या स्वत:च्या जमिनीवर व्यवसाय थाटून आर्थिक रूपाने स्वावलंबी बना, असे आवाहन रवी नाईक यांनी गोमंतकीयांना केले आहे.