Ratnagiri | आमच्या आरोग्याशी खेळू नका"; लक्ष्मी ऑरगॅनिकच्या गेटसमोर जनशक्तीचा हुंकार
लोटे एमआयडीसीत आंदोलनाचा एल्गार
चिपळूण - खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी व तिच्या पीफास (PFAS) उत्पादनाच्या विरोधात सोमवारी नागरिकांनी जोरदार मोर्चा काढला. स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार हल्लाबोल आणि कंपनी विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
कोकण नागरी संघर्ष समिती लोटे, पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती आणि परिसरातील स्थानिक नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. कंपनीपासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर मोर्चाला पोलिस प्रशासनाने परवानगी दिली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मोर्चात महिला, युवक, शेतकरी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी हातात फलक घेत घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.घातक रसायनांच्या उत्पादनावर तत्काळ बंदी घालावी, पर्यावरण व मानवी आरोग्याला धोका निर्माण करणारे प्रकल्प तातडीने बंद करावेत अशा मागण्या करत जोपर्यंत कंपनी बंद होतं नाही तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.