अतिरेक नको...
नासम्यक्कृतकारी स्यात् अप्रमत्त: सदा भवेत् ।
कण्टको:पि हि दुश्छिन्नो विकारं कुरुते चिरम्
अर्थ-अयोग्य प्रकारे कोणतेही कार्य करू नये, (नेहमी) अप्रमत्त असावे (आपल्या परीस्थितीचा माज करू नये). चुकीच्या पद्धतीने तोडून (अर्धवट) काढला गेलेला काटा (पुढे) चिरकालीन (खूप काळ सोसावे लागणारे) विकार (वा दु:ख) देतो. समाजामध्ये अनेक प्रकारचे माज करणारे लोक आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये अती पैसा असणारे, अती ताकद असणारे, अती संपत्ती असणारे, अती विद्वत्ता असणारे, अती अधिकार असणारे असे विविध प्रकारचे अप्रमत्त लोक भेटतात. यांच्यासाठी सहा प्रकारचे ‘मद’ म्हणजेच माज संस्कृतमध्ये सांगितलेले आहेत. ‘कुलम्, वितम्, श्रुतम्, रुपम्, दानम्, शौर्य, तप:स्तथा प्राधान्येन मनुष्याणाम् सप्तैते मद हेतवा ......’
मी राजघराण्यात जन्मलो म्हणून मीच पंतप्रधान होणार, असं सांगणारे अनेक मूर्ख आपल्याला पाहायला मिळतात. माझ्याकडे खूप संपत्ती आहे म्हणून मलाच सगळे अधिकार हवेत, असे सांगणारे हे दिसतात. काही जणांची त्यांच्या गुणांमुळे कीर्ती पसरते. त्याचासुद्धा अभिमान इतका होतो की त्या बदल्यात अनेक नको असलेल्या गोष्टीही माणसं करत राहतात. याचा समाजाला, माणसाला त्रास होत राहतो.
या सगळ्यांनाच अप्रमक्त असं म्हटले आहे. रस्त्याने चालणारी मुलं माजुर्डेपणा करून रस्त्यातील दगड पायांनी लाथाडत चालतात. यातले दगड हाताने भिरकावून तळ्यामध्ये, नदीमध्ये फेकत असतात. अशा वेळेला या नदीत तळ्यात राहणाऱ्या प्राण्यांना उपद्रव होतो आणि त्यांच्यातीलच एक बेडूक बाहेर येऊन या मुलांना सांगतो की ‘असे दगड मारू नका तुमचा खेळ होतो, पण आमचा मात्र जीव जातो’. अशा अनेक घटना समाजामध्येसुद्धा घडत असतात. असा माज करण्यापेक्षा अशा वृत्ती थांबवणे किंवा नष्ट करणे फार महत्त्वाचं असतं.
अन्यथा या सगळ्या वाईट प्रथा पुन्हा कधीतरी डोकं वर काढतात. पैशाचा माज असणारे लोक जगातली कोणतीही गोष्ट पैशाने विकत घेऊ शकतात. त्यासाठी कोणावरही जबरदस्ती करू शकतात. परंतु ह्या लोकांच्या लक्षात येत नाही आपण सगळं काही विकत घेतलं तरी मृत्यू विकत घेऊ शकत नाही कारण मेल्यानंतर आपल्याला काहीही बरोबर नेता येत नाही. यावर फार सुंदर काही ओळी वाचायला मिळाल्या, ‘दुनिया मे आये और कमाये सोना, चांदी, मोती, मरने के बाद ध्यान मे आया कफन को जेब नही होती’. म्हणूनच कितीही पैसा असला तरी आणि नसला तरी शेवटी स्मशानातच जाणार. म्हणून कोणत्याही गोष्टीचा माज करू नये. मिळालेली संपत्ती ऐश्वर्य एका ठराविक मर्यादेनंतर स्वत:साठी न वापरता ती समाजासाठी वापरत गेलं तर ती सत्कारणी लागते आणि त्यातून सर्वत्र फक्त आनंद निर्माण होतो.
म्हणून कोणत्याही गोष्टी असण्याचा अहंकार म्हणजेच माज करू नये. खूप पैसा असलेले लोक मुलांना खूप शिकवतात. परदेशात पाठवतात आणि शेवटी एकाकी आयुष्य जगतात. हा सुद्धा पैशाचा माज माणसाला दु:ख देणाराच ठरतो. म्हणजेच अती खाणं, अती व्यायाम करणे, अती बोलणं, अती वाईट वागणं किंवा अती चांगलं वागणं या सगळ्या गोष्टी माणसाला गाळात घालणाऱ्याच असतात. अशावेळी मुलांवर चांगले संस्कार असतील, जबाबदारीची जाणीव असेल, एकमेकांच्या नात्यांबद्दल प्रेम, ओलावा असेल तरंच चांगल्या गोष्टी होऊ शकतील अन्यथा फक्त दु:खच वाट्याला येते.