विरोधासाठी विरोध करू नका
कोडारवासीयांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन : कोणाचीतरी फूस असल्याचा वर्तविला संशय
पणजी : एखाद्या प्रकल्पास पटण्यासारखे कारण असेल तरच विरोध करा, केवळ विरोधासाठी विरोध म्हणून किंवा कोणतरी फूस लावतो म्हणून चांगल्या कार्यास विरोध करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे. सरकारसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि तेवढ्याच महत्वाकांक्षी असलेल्या आयआयटी प्रकल्पासाठी आतापर्यंत चार ठिकाणी जागा पाहण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्येक ठिकाणी विरोध होत असल्याने त्या सर्व नाकारण्यात आल्या. त्यानंतर आता पाचवी जागा फोंडा तालुक्यात कोडार येथे निवडण्यात आली आहे. मात्र तिलाही विरोध होऊ लागला असून, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काल मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी, 100 टक्के साक्षरता असलेल्या गोव्यात लोकांनी आयआयटीसारख्या प्रकल्पांना विरोध करू नये. तरीही या प्रकल्पाला विरोध करण्यामागील पटण्यायोग्य कारण स्पष्ट करावे. कोणीतरी चिथावणी देतो, फूस लावतो म्हणून विरोध करू नये, हा राष्ट्रीय महत्वाचा प्रकल्प असून त्याचा फायदा गोव्यालाही होणार आहे, असे सांगितले.
दरम्यान, बेतोडा फोंडा येथे आयोजित जाहीर सभेत या प्रकल्पासाठी जमीन संपादन किंवा अन्य कोणतीही प्रक्रिया करताना स्थानिकांना विश्वासात घेतले गेले नाही, असा आरोप करून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यात पुढे बोलताना वक्त्यांनी, सदर प्रकल्पासाठी नियोजित संपादित सुमारे 14.5 लाख चौ. मी. हा खडकाळ भूखंड असल्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र सत्यस्थिती वेगळीच असून सदर भूखंडाचा थोडासाच भाग खडकाळ आहे व उर्वरित जमीन स्थानिक लोक शेती आणि बागायतीसाठी वापरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अशावेळी तेथे आयआयटी प्रकल्प आल्यास तेथील शेती, वनराई आणि जैवविविधतेचा ऱ्हास होईल. त्याचबरोबर वन्यजीवांना धोका निर्माण होईल, अशी भीती बैठकीत व्यक्त करण्यात आली होती.
ग्रामस्थांच्या या दाव्याला बैठकीस उपस्थित पर्यावरणवाद्यांनीही पाठिंबा दिला आणि प्रकल्प साकारल्यास या भागातील पर्यावरणाचे अतोनात नुकसान होईल असा इशारा दिला होता. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कोडार येथील नागरिकांचे मनपरिवर्तन करण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केले आहेत. यापूर्वी सत्तरीतील शेळ-मेळावली, लोलये काणकोण, रिवण सांगे आणि नंतर धारबांदोडा येथे संजीवनी साखर कारखान्याच्या परिसरात आयआयटी प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले होते. मात्र काही ठिकाणी विरोध तर काही ठिकाणी जमीन मालकी कागदपत्रांच्या अभावामुळे तो प्रकल्प होऊ शकला नाही. आता सदर प्रकल्पासाठी कोडार येथे जमीन निवडण्यात आलेली असतानाच तेथेही त्याला विरोध होऊ लागला आहे.