गणपती उत्सवातून उत्सवभान हरवू नये!
गोवा व शेजारील कोकण प्रांतात सध्या गणपती उत्सवाचा माहोल आटोकाट भरून राहिला आहे. घरोघरी पूजल्या जाणाऱ्या दीड दिवसांच्या ‘बाप्पाला’ नुकताच थाटामाटात निरोप देण्यात आला. चतुर्थीपासून सुरू झालेला हा आनंदी माहोल अनंत चतुर्दशीपर्यंत उत्सवमय वातावरणात भरून राहणार आहे.
दरवर्षी भाद्रपद चतुर्थीला येणाऱ्या या सणाची गोमंतकीय व कोकणवासिय जनता तेवढ्याच उत्सुकतेने वाट पाहते. जीवनातील सर्व समस्यांचे ओझे काहीकाळ बाजूला ठेवून कुटुंबियांसोबत आनंदात सुखाचे क्षण अनुभवते. यंदा या उत्सवावर महागाईचे सावट असूनही ‘नाही आनंदा तोटा’ या भावनेने गणपतीची सेवा मनोभावे करण्यात आली.
हिंदू शास्त्र-पुराणात सर्व गणांचा अधिपती, कला व विद्येचा अधिष्ठाता, असे गणपतीचे वर्णन केले आहे. हिंदू धर्मियांमध्ये कुठल्याही शुभकार्याची सुऊवात गणपती पूजनाने करण्याची प्रथा आहे. गणेशोत्सव हा धर्म व सण परंपरापुरता मर्यादित नाही. संस्कृती, समाज, पर्यावरण अशा मानवी उत्कर्षाच्या विविध माध्यमांशी तो जोडलेला आहे. त्याकडे केवळ उत्सव म्हणून न पाहता त्याच्या विविध प्रतिकात्मक ऊपांचे दर्शन घडले पाहिजे. गोवा, कोंकण व कर्नाटकातील काही भागात घरोघरी गणपती पूजण्याची जुनी परंपरा आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाची सुऊवात मात्र विशिष्ट हेतूने झाली. लोकमान्य टिळकांसारख्या विभूतींनी या उत्सवाला स्वातंत्र्यासाठी लोकजागृतीचे प्रभावी माध्यम बनविले. ज्या स्वातंत्र्याच्या प्रेरणेतून सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना साकारली, त्याच उत्सवाच्या माध्यमातून सुराज्य आणि सुधारणेचे उत्तरदायित्त्व अपेक्षित आहे. भारतीय संस्कृतीमधील प्रत्येक सण उत्सवामागे एखादी प्रेरणा व विधायक विचार सांगितलेला आहे. गणेश चतुर्थी हा तर निसर्ग पूजा व संवर्धनाचा संदेश देणारा उत्सव आहे. गणपती पूजनामागे निसर्गाची उपासना आहे. त्यामुळेच घरोघरी गणपती पूजताना निसर्गातील विविध फळे, फुले व वनस्पतींनी गणपतीसमोरील माटोळी सजविण्याची परंपरा आहे.
या पारंपरिक माटोळीला हल्ली कलात्मक स्वऊप प्राप्त झाले आहे. वैविध्यपूर्ण पर्यावरणीय साहित्याचे संकलन आणि कलात्मक सर्जनशिलतेचे दर्शन त्यातून घडते. मानवी जीवनाशी निसर्ग किती अनुऊप आहे आणि त्यातील जैवविविधता किती उपयुक्त आहे, हे गणपतीसमोर सजविल्या जाणाऱ्या माटोळीतून दिसते.
गणेशोत्सव हा कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देणारा सण मानला जातो. याच काळात रांगोळी, देखावे व इतर कलांना बहर येतो. पूर्वी गणपतीचे मखर व इतर सजावट ही निसर्गाशी अनुऊप असायची. मध्यंतरी मखर व देखाव्यांसाठी पर्यावरणविघातक साहित्याचा अतिरेकी वापर ही मोठी समस्या बनून राहिली होती. त्यामुळे थर्मोकोलसारख्या वस्तूंवर बंदी घालावी लागली. चिनी मातीच्या मूर्तींवर निर्बंध असले तरी ही समस्या पूर्णपणे सुटलेली नाही. भाविकांमध्ये प्रभावी जागृती, हाच त्यावर उपाय ठरू शकतो. मूर्तींवरील रासायनिक रंग हाही तेवढाच प्रदूषणकारी ठरत असून विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणात त्याचे दुष्पपरिणाम दिसू लागले आहेत. गणपती विसर्जनाच्यावेळी मूर्तीच्या अंगावरील फुले म्हणजेच निर्माल्य विसर्जनामुळे नदी व तलावामध्ये साचणारा खच भावनेच्याआड दुर्लक्षित राहतो. बऱ्याचठिकाणी पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेऊन मूर्तीवरील फुले विसर्जनापूर्वी काठावर जमा करण्याची व्यवस्था करून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. निर्माल्य विसर्जन ही धार्मिक परंपरा असली तरी त्यातून उभे राहणारे पर्यावरणीय प्रश्न तेवढेच घातक आहेत. त्याकडे भावनेच्या अंगाने न पाहता पर्यावरणीय रक्षणाचे उत्तरदायित्व म्हणून बघण्याची गरज आहे. मुळात शुद्ध अंत:करणाच्या पावित्र्याने केलेली भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचते, ही भावना जपताना नदीचे पावित्र्य राखण्याचे भान मात्र विसरले जाते. फटाक्यांमुळे होणारे बेसुमार वायू प्रदूषण आणि त्याच्या जोडीलाच रात्री उशिरापर्यंत वाजणाऱ्या कर्णकर्कश डिजेंमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, यामुळे विसर्जन मिरवणुका सुखदायक होण्यापेक्षा तापदायक होत चालल्या आहेत. या गोष्टींमुळे उत्सवांचे शुद्ध स्वऊप आपण सहजपणे विद्रुप करून टाकलेले आहे. शहरामधील वाढते प्रदूषण, अनियंत्रित कचऱ्याचे ढीग ही सध्या चिंतेची बाब बनली आहे. त्यात अशा उत्सवांच्या माध्यमातून भर पडत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये विकासाच्या आड गोव्याच्या पर्यावरण समृद्धीची मोठ्या प्रमाणात लूट चालली आहे. त्यात सुपीक शेती, समृद्ध जंगले आणि जमिनी ओरबाडल्या जात आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या लालसेतून गोव्याच्या सीमेला लागून असलेला कोंकण प्रांतही सुटलेला नाही. गोवा आज जात्यात तर कोंकण सुपात आहे, एवढाच काय तो फरक आहे. सण-उत्सवांतून जोपासलेली ही निसर्ग जतनाची परंपरा प्रादेशिक ओळख जपण्यासाठी कृतीत उतरली पाहिजे. या गोष्टींचा विचार उत्सव साजरा करताना विस्मरणात जाऊ नये. निसर्गाचे संवर्धन व्हावे, सर्वांना समृद्धी, आरोग्य लाभावे तसेच समाजातील एकता टिकून राहावी, ही या उत्सवामागील खरी प्रेरणा व विचार हरवू नये...!
सदानंद सतरकर