पाण्याची कमतरता भासू देऊ नका
राहुल शिंदे यांची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही, याची दखल घ्या, अशी सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केली. कागवाड तालुक्यातील मंगसुळी गावाला श्री शिंदे यांनी मंगळवार दि. 11 रोजी भेट देऊन बहुग्राम पाणी योजनेची पाहणी केली. पाण्याचे टँकर प्रत्येक 15 दिवसांनी स्वच्छ करण्यात यावे. उन्हाळ्यात या भागामध्ये पाण्याची कमतरता भासत असते. प्रत्येकाला पाणी मुबलक आणि स्वच्छ मिळावे, याची दखल घेऊन कार्य करीत राहावे, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. त्यानंतर, बहुग्राम पाणी योजनेसंबंधीच्या कागदपत्रांची तपासणी केली. जिल्हा पंचायतीचे उपसचिव बसवराज अडवीमठ, कागवाड तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी वीरण्णा वाली, अथणीचे कार्यकारी अधिकारी शिवानंद कल्लापूर, ग्रामीण पाणीपुरवठा-मलनिस्सारण खात्याचे साहाय्यक कार्यकारी अभियंता रवींद्र मुरगाली यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.