धार्मिक सलोखा बिघडू देऊ नका
गोवा हिंदू युवा शक्तीची म्हापसा पोलिसांकडे मागणी : काणकोण जुलूसप्रकरणी म्हापशात तक्रार दिल्याने आक्षेप
म्हापसा : म्हापसा पोलिसस्थानकात काणकोण जुलूससंबंधी निवेदन सादर करून मुद्दामहून येथील धार्मिक सलोखा बिघडवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांची त्वरित चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासंबंधी गोवा हिंदू युवा शक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी काल सोमवारी रात्री एकत्रीत येऊन म्हापसा पोलिसस्थानकाचे निरीक्षक निखिल पालेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात जयेश थळी, सुजन नाईक, सिद्धार्थ मांद्रेकर हर्षद स्वार, अमेय नाटेकर, संजय वालावलकर, आशिष शिरोडकर, उदय मुंज, प्रवीण च्यारी, विकास महाले, राज चिंचणकर, प्रवीणा उदय नार्वेकर उपस्थित होते. काणकोण येथे जुलूस काढण्यास शासनाने तिसऱ्यांदा अनुमती नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाला अनुसरून शासनाने हा निर्णय घेतला आहे. खरेतर हा काणकोण येथील स्थानिक पातळीवरील जुलूससंबंधीचा विषय असताना त्याबाबत म्हापसा पोलिसस्थानकात निवेदन सादर करून मुद्दामहून म्हापशातील धार्मिक सलोखा बिघडविण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप गोवा हिंदू युवा शक्तीतर्फे करण्यात आला.
जुलूसमध्ये घुसखोर असण्याची शक्यता
यावेळी जयेश थळी म्हणाले की, म्यानमार येथील रोहिंग्यांच्या समर्थनार्थ गोव्यात यापूर्वी तीन मिरवणुका काढण्यात आल्या आहेत. इस्त्रायलने गाझावर केलेल्या आक्रमणाच्या विरोधात आणि पेलेस्टाईनच्या समर्थनार्थ गोव्यात यापूर्वी मिरवणुका काढण्यात आल्या आहेत. गोव्यात भाडेकरू तपासणीच्यावेळी बांगलादेशी घुसखोर सापडले आहेत. गोव्यात हल्लीच बँकेच्या ‘ए.टी.एम’च्या चोरीमध्ये बांगलादेशी घुसखोर सापडले आहेत. ईदच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या जुलूसमध्ये बांगलादेशी घुसखोर किंवा रोहिंग्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे थळी म्हणाले.
काणकोणच्या चळवळीला पाठिंबा : मांद्रेकर
काणकोण येथे ‘हिंदवी स्वराज्य संघटना’ आणि काणकोणवासीय यांनी काणकोण येथे जुलूस काढण्यास विरोध दर्शवला आहे. काणकोणवासियांना आपल्या गावात नवीन धार्मिक प्रथा नको आहे. जे आहे ते सुरळीत चालू ठेवूया ही भूमिका योग्य असून या चळवळीला आमचे पूर्ण समर्थन आहे, असे सिद्धार्थ मांद्रेकर म्हणाले.
जुलूसास अनुमती देऊ नये : वालावलकर
पेलीस यंत्रणेने भारतभरातील जुलूससंबंधी घटनांचा अवश्य आढावा घ्यावा. अशा जुलूसमध्ये बांगलादेशी किंवा रोहिंग्या यांचा सहभाग असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, यामुळे गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांत गोव्यात जुलूस काढण्यास शासनाने अनुमती देऊ नये, अशी मागणी यावेळी सुजन नाईक व संजय वालावलकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली. प्रवीणा उदय नार्वेकर यांनीही याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी केली. जुलूस राज्यातून कायमचा बंद करावा अशी मागणी यावेळी नीशा वेर्णेकर यांनी केली. सुमारे दीड हजार गोवा हिंदू युवा शक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हापसा पोलीस स्थानकात जमा होऊन म्हापसा पोलिसांना निवेदन सादर केले. ‘श्रीराम जयराम जय जय राम’च्या घोषणा देत म्हापसा पोलिसस्थानक परिसर दणदणून सोडला.