निव्वळ बोळवण नको, अंमलबजावणीही करा
अर्थसंकल्पीय पूर्वतयारी बैठकीत विरोधी गटनेत्याचा टोला
बेळगाव : राजाच्या दरबारात गाणे गायिलेल्या गायकाचा सुमधूर आवाज ऐकून खुश झालेल्या राजाने त्याला चांदीचे बक्षीस देण्याचे सांगितले. त्यावर गायकाने दुसऱ्या दिवशी पुन्हा गाणी गायिली. त्यावेळी राजाने त्याला सोने देण्यास सांगितले. तिसऱ्यावेळी गाणे गायल्याने हिरे देण्यास सांगितले. मात्र, प्रत्यक्षात बक्षीस न मिळाल्याने सहा महिन्यांनंतर गायक राजाकडे गेला. तुम्ही जाहीर केलेले बक्षीस मिळाले नाही, अशी विचारणा केली. त्यावर राजाने देण्या-घेण्याचा व्यवहार ठरला नसून तुझ्या गायनाने माझे कान तृप्त झाले आणि माझ्या आश्वासनाने तुझे कान तृप्त झाले, असे सांगत गायकाची बोळवण केली. त्याचप्रमाणे महापालिका बैठकीतदेखील झालेल्या चर्चांवर अंमलबजावणी करण्याऐवजी उपस्थितांचे कान तृप्त करून पाठविले जात असल्याचा मिश्कील टोला विरोधी गटनेते मुजम्मील डोणी यांनी अर्थसंकल्प बैठकीत लगावला.
महापालिकेच्यावतीने अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी दरवर्षी पूर्वतयारी बैठकीचे आयोजन केले जाते. बैठकीवेळी उपस्थितांकडून विविध सूचना केल्या जातात. पण सदर सूचना ऐकून घेऊन त्यावर अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे दरवर्षी पुन्हा पुन्हा त्याच सूचना करण्याची वेळ येत आहे. केलेल्या सूचनांवर अंमलबजावणी होत नसली तर बैठकीचे आयोजन करून उपयोग काय, शहरातील पार्किंग समस्या, स्मशानभूमी समस्या, सार्वजनिक शौचालये, शौचालयांचा पाणीपुरवठा, प्रिपेड ऑटोरिक्षा स्टॅण्ड, बापट गल्लीतील बहुमजली पार्किंग व्यवस्था, बाजारपेठेतील सीसीटीव्ही कॅमेरे, घरपट्टीत वाढ न करणे, ऑनलाईन घरपट्टी भरण्याची व्यवस्था, हेल्पलाईन सेंटर, तळमजल्यातील पार्किंग समस्या, कचरा समस्या, शहरातील व्यायामशाळांची दुरुस्ती, स्विमिंग पूल, खंजर गल्लीचा विकास आदी विषयांवर दरवर्षी चर्चा केली जाते. मात्र, प्रत्यक्षात सदर प्रश्न निकालात काढण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे बैठकीचे आयोजन करून काय साध्य होणार? केवळ बैठकीला उपस्थित राहणाऱ्यांचे कान तृप्त करून पाठविले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.