केवळ प्रचार शुभारंभ नको, विकासाकामांचेही नारळ फोडा !
कोल्हापूर / विनोद सावंत :
महायुतीने राज्यातील विधानसभेच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात जाहीर सभा घेऊन फोडला होता. आता राज्यात महायुतीची एकतर्फी सत्ता आली आहे. कोल्हापुरातील दहाही जागांवर महायुतीला जनकौल मिळाला आहेत. त्यामुळे कोल्हापूरचा वापर केवळ राजकीय व्यासपीठ म्हणून न होता, राज्याच्या अर्थसंकल्पात कोल्हापूरचा प्राधान्याने विचार झाला पाहिजे. ज्याप्रमाणे प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फोडला जातो, त्याच पद्धतीने आता विकासकामांचही नारळ कोल्हापुरात फोडून वर्षानुवर्षे रखडलेली कामे, प्रकल्प मार्गी लावावेत अशी मागणी जिह्यातील नागरीकांतून होत आहे.
कोल्हापुरात जे घडते ते राज्यभर पसरते. राजकीय दृष्ट्याही कोल्हापूरला राज्यात एक वेगळे महत्व आहे. या सर्वामुळेच राजकीय पक्षाच्या प्रचाराचे नारळ येथेच फोडले जाता. यामुळेच महायुतीची राज्यातील निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूरातील मेरी वेदर मैदान येथील जाहीर सभेने फोडला. या सभेत महाविकास आघाडीचे नेत्यांनी विरोधात असणाऱ्या महाविकास आघाडीवर निशाणा साधला. महाराष्ट्राच्या विकासासाठी साथ देण्याचे आवाहनही जनतेला केले. 10 कलमी वचननामाही येथे जाहीर केला. 23 नोव्हेंबरला झालेल्या मतमोजणीत एकतर्फी महायुतीची सत्ता आली. 288 जागांपैकी 230 जागेवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. कोल्हापुरातून प्रचाराची सुरवात होणे आणि राज्यात एकतर्फी सत्ता आल्याने आता महायुती सरकारकडून कोल्हापूरकरांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. कोल्हापुरातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्याची मागणी जोर धरत आहे.
मागील अडीच वर्षात महायुतीने कोल्हापुरातील विकासकामे केली आहेत. परंतू काही कामे आणखी होणे आवश्यक आहे. काही कामांचा निधीही जाहीर केला आहे. यामध्ये पूर नियंत्रणासाठी 3200 कोटी. कन्व्हेशन सेटरसाठी 277 कोटी, अमृत योजना टप्पा दोन 350 कोटी, रंकाळा सुशोभिकरण, पंचगंगा सुशोभिकरण, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्याच्या दुसऱ्या टप्प्यातील 15 कोटींचा समावेश आहे. महायुती सत्तेवर आल्याने ही विकासकामे मार्गी लागण्याची अशा पल्लवीत झाल्या आहेत.
अंबाबाई पावली, विकासकामांचा सपाटा लावून नवस फेडा
महायुतीचे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांनी 5 नोव्हेंबरला करवीर निवासनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन राज्यात सत्ता येण्याचे साकडे घातले होते. अंबाबाईचा कौल कोणाला असणार याबाबतही कोल्हापुरात चर्चा होती. अखेर महायुतीला अंबाबाई पावली. 230 जागेवर त्यांचे उमेदवार जिंकले. त्यामुळे आता महायुतीने कोल्हापुरात विकासकामांची गंगा आणून अंबाबाईचा नवस फेडणे अपेक्षित आहे. अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यातील उर्वरीत निधी त्वरीत वर्ग व्हावा.
फडणवीस दिलेला शब्द पाळणार का ?
अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरवात करत आहे. अंबाबाईचे दर्शन घेतले की विजय निश्चित असतो, असे महायुतीच्या प्रचाराच्या सुरवात करण्याच्या कोल्हापुरातील सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले होते. तसेच तुम्हचा आशिर्वाद द्या, तुम्हच्या मनातील महाराष्ट्र घडवतो, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. फडणवीस दिलेला शब्द पाळतील, अशीही अपेक्षा आता व्यक्त होत आहे.
रस्ते तातडीने करणे आवश्यक
राज्यशासनाने 100 कोटींचा निधी रस्त्यांसाठी दिला आहे. परंतू यातून केवळ शहरातील 16 रस्ते होणार आहेत. उर्वरीत रस्त्यांचीही चाळण झाली आहे. यासाठीही विशेषबाब म्हणून जादाचा निधी देणे आवश्यक आहे.
एकहाती सत्ता , आता तरी हद्दवाढ होणार काय ?
गेल्या 52 वर्षापासून हद्दवाढ झालेली नाही. यामुळे शहराच्या विकासावर परिणाम होत आहे. अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मुलभूत सुविधा देण्यास अडचणीचे ठरत आहे. वाहतुकीची कोंडी होत आहे. एकहाती सत्ता आल्याने महायुतीने शहराची हद्दवाढ करणे अपेक्षित आहे.
कोल्हापूर शहरात प्राधान्यक्रमाने करावी लागणारी कामे
पुरेशी पार्कींग व्यवस्था, महिलांसाठी स्वच्छतगृहांची उभारणी.
सुशोभिकरणसोबत पंचगंगा, रंकाळा तलाव प्रदूषण मुक्त करणे.
थेटपाईपलाईनची विद्युतलाईन भूमिगत टाकण्यासाठी निधी देणे.
आयटी पार्क करणे.
कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ करणे.
महापालिकेस विशेष पॅकेजसह जीएसटी अनुदानात वाढ करणे.
अंबाबाई व जोतिब तीर्थक्षेत्र विकास
शिरोळ तालुक्यातील क्षारपडमुक्त जमीन
औद्योगिक प्रकल्प निर्मितीतून रोजगार उपलब्धता