For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एक हजारांश चुकीकडेही दुर्लक्ष नको !

06:28 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
एक हजारांश चुकीकडेही दुर्लक्ष नको
Advertisement

नीट परीक्षेसंबंधात सर्वोच्च न्यायालयाचा इशारा : केंद्र-एनटीएला नोटीस

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

नीट किंवा कोणत्याही परीक्षेच्या व्यवस्थापनात एक हजारांश चूक जरी झाली असेल, तरी तिच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय चाचणी परीक्षा प्राधिकरणाला नोटीस पाठविण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 8 जुलैला करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

Advertisement

नीट-युजी परीक्षेतील कथित घोटाळ्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका सादर करण्यात आली आहे. ही पूर्ण परीक्षाच रद्द करुन नव्याने परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात प्राथमिक सुनावणी करण्यात आली. एक हजारांश इतक्या प्रमाणात जरी चूक झाली असेल किंवा गैरप्रकार असतील तरी ते खपवून घेतले जाऊ नयेत. हा रुग्णांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. गैरप्रकार करुन जर कोणी डॉक्टर होणार असेल तर रुग्णांसाठी मोठा धोका ठरु शकतो. त्यामुळे ही परीक्षा घेण्यात काही चूक झाली असेल तर ती मान्य करुन ती सुधारण्याची कृती त्वरेने करणे आवश्यक आहे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचा सन्मान व्हावा

या परीक्षेवर असंख्य विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. ते या परीक्षेत यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करतात. त्यांच्या प्रयत्नांचा सन्मान राखला जाणे आवश्यक आहे. गैरप्रकारांच्या माध्यमातून परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न कोणी केल्यास तो या प्रामाणिक आणि कष्टाळू विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. त्यामुळे थोडे जरी गैरप्रकार असतील किंवा चुका असतील तर त्या दूर झाल्याच पाहिजेत, असे नोटीस देताना सर्वोच्च न्यायालयाने आपल्या टिप्पणीत स्पष्ट केले आहे.

काय आहे प्रकरण

5 मे 2024 या दिवशी देशभरात शेकडो शहरांमध्ये नीट-युजी चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला 24 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा परिणाम 4 जूनला घोषित करण्यात आला. या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आणि प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप अनेक विद्यार्थ्यांनी केला आहे. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करण्यात आल्या असून त्यांच्यावर सुनावणी होत आहे. अनेक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आल्याचे प्रकरणही समोर आले आहे. मात्र, परीक्षा प्राधिकरणाने प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप नाकारला असून ग्रेस मार्क रद्द केले आहेत. ग्रेस गुण दिलेले विद्यार्थी पुन्हा परीक्षेला बसू शकतात. त्यांच्यासाठी पुन्हा परीक्षा घेतली जाईल, असेही प्राधिकारणाने स्पष्ट केले आहे. गेले अनेक दिवस हा विवाद होत आहे.

Advertisement
Tags :

.