दिसण्यावर जाऊ नका...
‘वेश असावा बावळा, परी अंतरी नाना कळा’ अशी म्हण आहे. तिचा अर्थ असा, की. वरुन जसे दिसत असते, तसे आत असेलच असे नाही. वरुन साध्या दिसणाऱ्या वास्तूंच्या आतल्या भागात अनेक आश्चर्यकारक आणि अद्भूत बाबी असू शकतात. शोधणाऱ्याला त्या सापडतात. लंडन येथे वास्तव्यास असणाऱ्या सँडी ब्रेटमायर नामक महिलेला आफ्रिका खंडातील केनिया देशात असाच अनुभव आला आहे. या देशातील एका दाट झाडीच्या प्रदेशात ती भटकत असताना तिला एक साधीसुधी दिसणारी झोपडी आढळली. अशा निर्मनुष्य प्रदेशात ही झोपडी कुठून आली, असा प्रश्न तिच्या मनात आला. त्यामुळे तिने आत जायचे ठरविले.
आत गेल्यानंतर तिने जे पाहिले ते आश्चर्यकारक होते. कारण वरुन लहान वाटणाऱ्या या झोपडीत भूगर्भात दडलेला एक लांबलचक मार्ग आढळला. आत येणाऱ्यांनी पादत्राणे काढून ठेवावीत, अशी सूचनाही तेथे लिहिलेली आढळली. त्यानुसार तिने आपले बूट काढून आत प्रवेश केला आणि या मार्गाने ती सरळ केनियाच्या अत्यंत घनदाट वनाच्या मध्यभागी पोहचली. हा मार्ग वनातील अनेक प्राणी सुरक्षितपणे संचार करण्यासाठी उपयोगात आणतात हे तिच्या लक्षात आले. नंतर बाहेर आल्यानंतर या मार्गाची अधिक माहिती मिळविण्याचा तिने प्रयत्न केला. तेव्हा या मार्गावरुन सिंहाची आणि अन्य क्रूर प्राण्यांची ये जा असते, अशी माहिती तिला स्थानिकांनी दिली. ती या बाहेरुन न दिसणाऱ्या मार्गावरुन जात असताना तिची कोणत्याही अशा हिंस्त्र प्राण्याशी गाठ पडली नाही, हे तिचे भाग्यच, अशीही प्रतिक्रिया अनेक स्थानिकांनी व्यक्त केली. या महिलेनेही आपला या अद्भूत प्रवासाचा व्हिडीओ प्रसिद्ध केला असून आपण पाहिलेला हा मार्ग हे केनियातील सर्वात सुंदर स्थान असल्याचे तिचे म्हणणे आहे.