For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न जाओ सैंया

06:20 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
न जाओ सैंया
Advertisement

ना ना करते प्यार तुम्हीं से कर बैठे

Advertisement

करना था इनकार मग़र इकरार तुम्हीं से कर बैठे

अंताक्षरी म्हणजेच गाण्याच्या भेंड्या खेळताना पटकन सुचणारं हे कितीतरी जुनं गाणं. कमालीच्या देखण्या शशिकपूरवर चित्रित झालेलं आहे. ते सुमन कल्याणपूर आणि रफी साहेबांनी गायलंय वगैरे आपल्याला माहीतही नसतं तेव्हा. आपण आपलं ‘न’ आला की हे गाणं ठोकून देतो आणि मोकळं होतो. नाही या शब्दाचा अर्थ दरवेळी नाही असाच असतो असं नाही. स्त्रियांच्या नकारात होकार असतो अशी सोयीस्कर समजूत गेली कित्येक वर्षं बऱ्याच प्रेमवीरांची करून दिली गेली आहे किंवा तशी त्यांनी करून घेतलेली असते. पण ‘नो मीन्स नो’ हे त्यांना समजावून सांगण्यासाठी पिक्चर काढायची वेळ येते, यातच सगळं आलं. पण काहीवेळा या ‘नाही नाही’चा खट्याळपणा और असतो.

Advertisement

नको रे कृष्णा रंग उडवू साडी भिजते

मध्यरात्री चांदण्यात थंडी वाजते

म्हणणाऱ्या गोपिकेला मध्यरात्री चांदण्यात त्या निमित्ताने कृष्णाचा खोडसाळपणा, त्यानं केलेला छळवाद, छेडाछेडी नको असते का? हवी असते की. पण थेट आमंत्रण कसं देणार? बायकांच्या जातीला शोभत नाही ते! आणि नको म्हटलं की माणूस अदरून करतो. म्हणून ते खोटं खोटं नको येतं बरं! बहुतेक सर्व प्रकारच्या शृंगारिक गीतात हे लाडिक नकोचं ध्रुवपद असतंच.

मैं तुमसंग ना बोलूँ पिया

ढीठ लंगरवा छोड़ो मोरी बैंया

यात राग आहे खरं तर...पण सैंयाने सोडून निघून जावं अशी इच्छा नसते तर दुसरीकडे भरकटल्याबद्दल पश्चात्ताप करून तिच्याचकडे रहावं अशी एक इच्छा असते ती. पटदीपची ही पारंपरिक चीज आहे. आणि त्यात व्यक्त होणारी तक्रार किंवा राग हा टिकणारा नसतो हे त्या चिजेच्या विस्तारात कळून येतं. रागापेक्षा यात दुखावलेपणा जास्त आहे. दु:ख, हताशा जास्त व्यक्त होते. नकाराच्या संतापाचा थयथयाट पहायचा असेल तर सोहनी मधली पं. मालिनीताई राजूरकर यांनी गायलेली

काहे अब तुम आये हो मेरे द्वारे

सौतन संग जागे अनुरागे रस पागे भागे

त्यातल्या अंतऱ्यात

झूठी झूठी बतियाँ करो ना मनरंग अब

वहीं जावो जिन युवती संग अनुरागे

असा स्पष्ट नकार देऊन चक्क हाकलून काढायची भाषा केली आहे. उत्तरांगप्रधान असलेल्या सोहनी रागात हा भाव इतका सुंदर जुळून येतो की क्या बात है... सात्त्विक संतापाने केलेलं भांडण इतकं सुंदर असू शकतं? तर उत्तर आहे हो..पण याच सोहनीमधली पं. कुमार गंधर्वांनी खूप वेगळ्या टचने गायलेली

रंग ना डारो शामजी गोरी पे

रंग ना डारो शामजी

ही बंदिश मात्र ‘नको’ आणि ‘नाही’ चा वेगळाच आयाम दाखवून जाते. यात इच्छा तर आहे पण नकार दिला जातो कारण समाजाची आणि सासरच्यांची भीती! यातही बजावणी आहे, हतबलता आहे. म्हणजे अगदी ‘मैं तो हारी’ म्हणण्याइतके हात टेकलेत तिनं. आहे की नाही? ही बंदिश अनेक मोठमोठ्या गायकांनी गायलीय आणि ती लोकप्रिय आहे. त्यामुळे सापेक्षतेने अभिव्यक्ती बदलते. नकाराचे तेवढेच अधिक रंग पहायला मिळतात.

हाच नकार लाल गुलाबी लाजेत मिळून येतो तो

ना डारो रंग मोपे

तंग बसन अंग अंग प्रकट होत

ब्रिजवासी देखत सब

या बागेश्रीतल्या बंदिशीत. हा खरोखरच नकार आहे. पण तो एकांतातला नर्मविनोदी शृंगार लोकांत केल्यामुळे आलेला नकार आहे. तिथे ब्रिजवासी नसते तर त्याचा कदाचित होकारच व्हायचा! अशी एकेक गंमत असते या नकारात.

अशा अडचणीच्या वेळी मग हलक्याने, चुपचाप रीतिरिवाज धरून प्रेम करायचं म्हणून मग

नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत

परि सारे हलक्याने आड येते रीत

असं ती हळूच प्रियकराला सुचवते. किती गोड! नकार द्यायचा आणि होकारही कळवायचा त्यातूनच. भारी कोड लँग्वेज आहे ही. काही काही वेळा असं होतं की काहीच बोलण्याची गरज नसते. शांतता पुरेशी बोलकी झालेली असते. ये हृदयीचे ते हृदयी जाण्यासाठी शब्देविण संवादु केला तरी चालतो इतकं नातं मुरलेलं असतं. मग तिला निवांत जवळ घेत तो म्हणतो,

कुछ ना कहो कुछ भी ना कहो

क्या कहना है क्या सुनना है

मुझको पता है तुमको पता है

समय का ये पल थम सा गया है

और इस पल में कोई नहीं है

बस एक मैं हूँ बस एक तुम हो..

अतिशय सुंदर गुलाबी एकांत आणि अनिल कपूर मनीषा कोईरालाची ती जोडी इतकी संयतपणे व्यक्त होत राहते ना... आहाहा.. कुमार सानूचा तो जादुई आवाज, मनीषाचं ते राजसी सौंदर्य, पंचमदांचं मिठ्ठास म्युझिक आणि ऐकायला आवश्यक असणारी शांतता... बस्स. लाजवाब...

एखादा नकार भलताच वेगळा असतो. दादा कोंडकेच्या सोंगाड्या चित्रपटात एक फक्कड लावणी आहे.

नाही कधी का तुम्हास म्हटलं दोष न द्यावा फुका

अहो राया मला पावसात नेऊ नका.

म्हणजे मी कधी म्हणून तुमच्या कुठल्याही गोष्टीला नकार दिला नाहिये तर माझं एवढं ऐका अशी काकुळत यात आहे. पुढे घडणाऱ्या गडबडीला आवर घालणारी ती अगदी घायकुतीला येऊन विनवते आहे पण तो ऐकतो का? हा एक वेगळाच विषय आहे. आणि कधी कधी तर पुरुषही विनवणी करतो ती अशी,

नको करू सखी असा साजिरा शृंगार

आधीच कट्यार त्यात जीवघेणी धार

तिचा शृंगारच त्याचा संयम उधळून द्यायला पुरेसा आहे. भलतंच काही घडू नये म्हणून केलेली विनवणी किंवा तिनं जवळ यावं, येऊ द्यावं म्हणून केलेली छेडछाड असं काहीतरी म्हणता येईल हे. सलील कुलकर्णी यांचं हे गाणं. नकार असाही असतो. सगळ्यात कळवळायला लावणारा नकार मात्र काहीसा असा असतो.

न जाओ सैंया छुडाके बैंया

कसम तुम्हारी मैं रो पडूँगी

पण सगळ्या नकारांत विरह थांबवण्याची शक्ती थोडीच असते? मग विरह ठरलेला. त्यासाठीच तर तो नकार असतो ना? नकोच तो...

अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :

.