For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहशतवाद्यांना थारा देऊ नका, अन्यथा...

06:52 AM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
दहशतवाद्यांना थारा देऊ नका  अन्यथा
Advertisement

इराणचा पाकिस्तानला इशारा 

Advertisement

वृत्तसंस्था / तेहरान

इराणने अत्यंत कठोर शब्दांत पाकिस्तानला दहशतवादी संघटनांना नियंत्रित करण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्ताने सीमेचे रक्षण करावे आणि स्वत:च्या क्षेत्रात दहशतवादी तळ निर्माण होण्यापासून रोखावेत, अन्यथा आम्हाला कठोर पाऊल उचलावे लागेल, असे इराणचे गृहमंत्री अहमद वाहिदी यांनी म्हटले आहे. इराणच्या सिस्तान प्रांतात पोलीस मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर इराणने ही संतप्त भूमिका घेतली आहे. या हल्ल्यात 12 पोलीस मारले गेले होते.

Advertisement

हे दहशतवादी पाकिस्तानातून इराणमध्ये दाखल झाले होते असे वाहिदी यांनी म्हटले होते. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाकडून इराणमधील हल्ल्याची निंदा करण्यात आली होती. परंतु इराणचे यामुळे समाधान झालेले नाही. त्याने पाकिस्तानला दहशतवाद रोखण्याकडे अधिक लक्ष देण्याची सूचना केली आहे.

इराणच्या गृहमंत्र्यांनी सिस्तान-बलुचिस्तानातील पोलीस स्थानक आणि आसपासच्या भागाचा दौरा केला आहे. वस्तुस्थिती जाणून घेतल्यावर वाहिदी यांनी पाकिस्तानवर संताप व्यक्त केला. आमच्या भूमीत हल्ला करणारे दहशतवादी हे पाकिस्तानातून येत असल्याचे आम्हाला वारंवार दिसून आले आहे. आमच्या शेजारी देशाने स्वत:च्या सीमांवर नियंत्रण ठेवून सतर्कता बाळगावी. केवळ सीमाच नव्हे तर पाकिस्तान सरकारने दहशतवादी गटांना तळ निर्माण करता येणार नाही हे पहावे असे वाहिदी यांनी म्हटले आहे.

इराणमधील 15 डिसेंबर रोजीच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात संताप दिसून येत आहे. इराणच्या सुरक्षा दलांवरील हा अलिकडच्या काळातील सर्वात मोठा हल्ला आहे. इराणच्या गृहमंत्र्यांसोबत विदेश धोरण समितीचे सदस्य फिदाहुसैन मालिकी यांनी या घटनेसाठी आम्ही पाकिस्तानला एका गुन्हेगाराप्रमाणे पाहत आहोत असे म्हटले आहे. पाकिस्तानच्या भूमीवरच दहशतवादी संघटनांना थारा मिळत आहे. पाकिस्तानने त्वरित या दहशतवादी संघटनांना रोखावे असे उद्गार त्यांनी काढले आहेत.

इराणची कठोर भूमिका पाकिस्तानच्या अडचणी वाढविणारी ठरू शकते. पाकिस्तान यापूर्वीच अन्य शेजारी देशांसोबत असलेल्या खराब संबंधांना सामोरा जात आहे. भारतासोबतचा त्याचा संघर्ष जगजाहीर आहे, परंतु अलिकडच्या काळात अफगाणिस्तानातील तालिबानसोबतही त्याचा वाद निर्माण झाला आहे. टीटीपीवरील कारवाईवरून पाकिस्तानचे सरकार आणि तालिबानचे संबंध बिघडले आहेत.

Advertisement
Tags :

.