खासगी पशूसेवा देणाऱ्यांच्या नादी लागू नका
तालुका पशुवैद्याधिकारी डॉ. आनंद पाटील यांचे स्पष्टीकरण : पाळीव प्राण्यांना लस टोचून घेण्याचे आवाहन
बेळगाव : भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील 31 काळविटांचा घटसर्पामुळे (एचएस) मृत्यू झाल्याचे निदान झाले आहे. काही प्रसारमाध्यमांकडून हेग्गेरी, दासरवाडी व आजूबाजूच्या गावातील पाळीव जनावरांचा घटसर्पामुळे मृत्यू झाल्याची बातमी प्रसारीत केली जात आहे. पशुसंगोपन खात्याकडून घटसर्प, लम्पी स्कीन आणि लाळ्याखुरकत रोगावर प्रतिबंधात्मक लस पाळीव जनावरांना टोचली जात आहे. त्यामुळे आतापर्यंत एकाही पाळीव जनावराचा घटसर्पामुळे मृत्यू झालेला नसून एखाद्या ठिकाणी जनावरांना लक्षणे आढळून आल्यास त्यांनी नजीकच्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांशी संपर्क साधावा. खासगी पशूसेवा देणाऱ्यांच्या नादी लागू नका, अशी स्पष्ट सूचना तालुका पशुवैद्याधिकारी डॉ. आनंद पाटील यांनी केली आहे.
राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील 31 काळविटांचा गूढरित्या मृत्यू झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. काळविटांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला असावा याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. मृत्यू झालेल्या काळविटांचा पोस्ट मार्टेम रिपोर्ट रक्ताचे नमुने बेंगळूर येथील बन्नेरूघट्टा प्राणीसंग्रहालयातील प्रयोग शाळेला पाठविण्यात आला होता. त्या ठिकाणाहून उपलब्ध झालेल्या अहवालानुसार काळविटांचा मृत्यू घटसर्पामुळे झाल्याचे निदान करण्यात आले आहे. याबाबतचे स्पष्टीकरण प्राणीसंग्रहालयातील डॉक्टर आणि पशुसंगोपन खात्याच्यावतीने देण्यात आले आहे. घटसर्पामुळे काकती, हिरेबागेवाडी, हेग्गेरी, दासरवाडी गावांतील पाळीव प्राण्यांच्या मृत्यू होत असल्याची माहिती काही प्रसारमाध्यमामधून प्रसिद्ध केली जात आहे. मात्र हे वृत्त निराधार असल्याचे पशुसंगोपन खात्याचे तालुका पशुवैद्याधिकारी डॉ. आनंद पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
पशुपालकांनी भीती बाळगू नये
वनप्राण्यांना घटसर्प, लाळ्याखुरकत आणि लंम्पी स्कीन प्रतिबंधक लस टोचणे अशक्य आहे. मात्र जिल्ह्यातील पाळीव प्राण्यांना ही लस टोचण्यात आली आहे. जिल्ह्यातील 11 लाख 47 हजार 350 पाळीव जणावरांपैकी 9 लाख 70 हजार 500 जनावरांना अद्यापर्यंत लंम्पी स्कीन लस टोचण्यात आली आहे. आतापर्यंत 90 टक्के लक्ष्य गाठण्यात यश आले आहे. 9 ते 10 वर्षांच्या वासरांना लस टोचण्यात आली नसल्याने काही ठिकाणी तशा वासरांना लम्पी स्कीनची लागण होत आहे. लसीकरण करण्यासाठी गोठ्यावर येणाऱ्या पथकाकडून जनावर मालकांनी आपल्या जनावरांना लस टोचून घ्यावा. ज्या ठिकाणी लसीकरण झाली नसेल त्याबाबतची माहिती कळविल्यास योग्य सेवा पुरविली जाईल. राणी चन्नम्मा संग्रहालयातील सात काळविटांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून पशुपालकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. ज्या ठिकाणी लम्पी स्कीनबाबतची लक्षणे पाळीव जनावरांमध्ये दिसून आल्यास त्यांनी तातडीने ही माहिती स्थानिक पशू वैद्याधिकाऱ्यांना द्यावी. कृपा करून खासगी प्रॅक्टीस करणाऱ्यांच्या नादी लागू नका, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.