सर्वसामान्यांना अडथळा करु नका
आंदोलक शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाची सूचना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शेतकरी आंदोलकांनी सर्वसामान्यांच्या हालचालींना अडथळा करु नये, तसेच राष्ट्रीय महामार्गांवर वाहतुकीची कोंडी होईल असे वर्तन करु नये, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. शांततापूर्ण आंदोलने हा लोकशाहीने दिलेला अधिकार असला, तरी त्याचे क्रियान्वयन जबाबदारीने होणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणी प्रसंगी स्पष्ट केले आहे.
पंजाबचे शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांच्या संदर्भात ही याचिका होती. डल्लेवाल यांना आंदोलनस्थळातून उचलून अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे. त्यांना न्यायालयासमोर उपस्थित करण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी करणारी हेबियस कॉर्पस याचिका काही शेतकरी आंदोलकांनी सादर केली होती. या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका काही महत्वाच्या सूचना करत हातावेगळी केली आहे.
डल्लेवाल यांची मुक्तता
डल्लेवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तथापि, आता त्यांची सुटका करण्यात आली आहे. ते पुन्हा आंदोलनस्थळी पोहचले आहेत. अशा स्थितीत ही याचिका आता अर्थपूर्ण राहिलेली नाही. त्यामुळे ती हातावेगळी करण्यात येत आहे. असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयपत्रात स्पष्ट केले आहे.
कायदेशीर आधाराची मागणी
कृषी उत्पादनांच्या किमान आधारभूत किमतीला कायदेशीर पाठबळ देण्यात यावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन चालविले आहे. ही मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत उपोषण करण्याचा निर्धार डल्लेवाल यांनी व्यक्त केला. खनौरी सीमारेषेवर त्यांचे आंदोलन होत आहे. पंजाब सरकारने केंद्र सरकारच्या सहकार्याने आपल्याला आंदोलनस्थळापासून दूर नेण्याचा डाव रचला होता, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांना पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना लुधियाना येथील रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले. आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयात नेण्याच्या मिषाने आपल्याला अटकच करण्यात आली होती, असा आरोपही डल्लेवाल यांनी केला आहे.
आंदोलनस्थळी स्वागत
डल्लेवाल यांची सुटका झाल्यानंतर ते पुन्हा आंदोलनस्थळी पोहचले आहेत. खनौरी सीमारेषेवर त्यांचे इतर आंदोलक नेत्यांनी स्वागत केले. संयुक्त किसान मोर्चा (बिगर राजकीय) चे नेते स्वरणसिंग पंढेर यांनी डल्लेवाल यांचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वात आंदोलन पुढे चालविले जाईल, अशी घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांची दिल्लीकडे वाटचाल
उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनीही आंदोलन छेडले असून त्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढला आहे. नोयडा येथे बॅडिकेड्स् लावून मोर्चा अडविण्यात आला होता. तथापि, शेतकऱ्यांनी बॅडिकेड्स् ओलांडून दिल्लीकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी महामार्गावर टँकर्स आणि ट्रक्स उभे करुन मोर्चाची वाट आडवली आहे. कृषी उत्पादनांच्या किमान आधारभूत दराला कायदेशीर पाठबळ मिळावे अशी मागणी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचीही आहे. तसेच त्यांच्या अन्य काही मागण्या आहेत. हे आंदोलक शेतकरी प्रामुख्याने पश्चिम उत्तर प्रदेशातील आहेत.
महामार्गावर वाहतूक कोंडी
उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलकांनी महामार्गावरुन दिल्लीकडे वाटचाल चालविल्याने उत्तर प्रदेशातून दिल्लीकडे येणाऱ्या महामार्गांवर वाहतूक केंडी झाली आहे. जवळपास पाच किलोमीटर अंतराची वाहनांची रांग दोन्ही बाजूंकडून लागली आहे. मात्र, आंदोलन शांततापूर्ण आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.