For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एआयच्या आहारी जाऊ नका, त्याला मुठीत ठेवा

06:33 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
एआयच्या आहारी जाऊ नका  त्याला मुठीत ठेवा
Advertisement

तंत्रज्ञान-दशा व दिशा’ परिसंवादात व्यक्त झालेले मत

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआय) आहारी जाऊ नका. त्यापेक्षा एक मदतनीस, सहकारी म्हणून त्याचा पुरेपूर वापर करा, अन्यथा तोच तुमच्या मानगुटीवर बसून सर्वस्व हरण करेल, असा सल्ला पणजीत आयोजित जागतिक मराठी परिषदेत एका परिसंवादाच्या माध्यमातून देण्यात आला.

Advertisement

‘तंत्रज्ञान - दशा आणि दिशा’ या परिसंवादात कृत्रिम बुद्धीमत्ता आणि सायबर सुरक्षा या विषयावर हे सत्र आयोजित करण्यात आले होते. त्यात प्रा. डॉ. रामराव वाघ, डॉ. मनोहर चासकर आणि प्रसाद शिरगांवकर यांचा सहभाग होता. शोध असो किंवा तंत्रज्ञान, त्यामागे मेंदू हा माणसाचाच असतो. त्यामुळे कितीही शोध लागले आणि तंत्रज्ञान विकसित झाले तरी त्यापासून घाबरण्याचे कारण नसते. कारण यापूर्वी कित्येक युगे कोणतेही तंत्रज्ञान नसताना माणूस जगला आहे आणि आजच्या अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाच्या युगातही तो जगत आहे. भविष्यात आजच्यापेक्षाही अधिक प्रगत तंत्रज्ञान तयार होणार आहे आणि तेव्हाही माणूस जगणार आहे. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. माणसाने स्वत:च्या मनावर पूर्ण नियंत्रण आणि ताबा ठेऊन तंत्रज्ञानाचा वापर करावा, मात्र त्याच्या आहारी कधीच जाऊ नये. तरच ते तंत्रज्ञान माणसाच्या उपयोगी येईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

शोध आणि संशोधन यांचा जन्म माणसाच्या गरजेतून झालेला असतो. जेव्हा आमच्याकडे लँडलाईन फोन होते तेव्हा प्रत्येकाला किमान 25 तरी फोन क्रमांक तोंडपाठ असायचे. आज मोबाईलच्या जमान्यात कित्येकांना कधीकधी स्वत:चासुद्धा मोबाईल क्रमांक स्मरणात राहत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जेव्हा गणकयंत्रे नव्हती तेव्हा आम्ही धडाधड तोंडी गणिते करायचो. आज विद्यार्थीसुद्धा वर्गात कॅल्क्युलेटरमधून गणिते सोडवतात, असे चित्र दिसून येते. याचाच अर्थ आम्ही तंत्रज्ञानाच्या आहारी गेलो आहोत, हेच सिद्ध होते.

स्वबुद्धीला सतत चालना द्या

संगणक, गणकयंत्रे यांचा वापर अवश्य करावा, पण त्यांच्यावर पूर्णत: अवलंबून राहण्यासारखी परिस्थिती स्वत:वर आणू नये. अन्यथा तुमचा मेंदूही स्वत:वर मर्यादा घालून घेईल. कारण आपला मेंदू त्यातील साठवलेल्या ज्या गोष्टींचा वापर होत नाही, त्या आपसूक काढून टाकतो. त्यामुळे प्रत्येकाने स्वबुद्धीला सतत चालना दिली पाहिजे.

विद्यार्थ्यांमध्ये अलर्टनेस आला पाहिजे

श्री. चासकर यांनी बोलताना, खास करून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या बाबतीत कोणत्याही परिस्थितीत विचलित होऊ नये. बारीकसारीक गोष्टींवर ठाम लक्ष्य ठेवले पाहिजे. त्यातून एआयकडून मिळणारी माहिती आणि ज्ञानाचा लाभ घेतला पाहिजे. संस्कृतमध्ये श्वाननिद्रा म्हणजे ज्याप्रकारे श्वान हे झोपेतसुद्धा जागृतावस्थेतच राहते, तोच अलर्टनेस विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये आणला पाहिजे. आज एआयमुळे जग एवढे फसवे झालेले असल्याने विद्यार्थ्यांमध्ये हे अलर्टनेस आले पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी ‘अल्पआहारी’ राहिले पाहिजे. म्हणजेच सायबर किंवा एआय तंत्रज्ञान यासारख्यां माध्यमातून जे काही आपल्या मेंदूमध्ये जाते त्यातील जी काही गार्बेज आहे, त्यामधील आपल्याला उपयोगी पडणारी निवडक आणि मोजकीच माहिती ठेऊन उर्वरित सर्व कचरा मेंदूतून बाहेर फेकला पाहिजे. असे काही गूण विद्यार्थ्यांनी स्वत:शी निगडीत ठेवले आणि त्यानुसार एआयचा उपयोग केला तर निश्चितपणे पुढील पाच वर्षांमध्ये जो काही बदल होईल तो स्वत:च्या आयुष्यात साठवून ठेवणार आहात, याची खात्री ठेवा, असे सांगितले.

सायबर सुरक्षा : भेडसावणारे प्रश्न

सायबर सुरक्षा विषयावर बोलताना डॉ. वाघ यांनी, ‘तंत्रज्ञान शाप की वरदान’? असा प्रश्न येतो तेव्हा त्या शापातील मोठा शाप म्हणजे सायबर सुरक्षा आहे, असे ते म्हणाले. संगणकातील कोणतीही गोष्ट घेतली म्हणजे सुरक्षा हा प्रश्न हमखास निर्माण होतो. तसे पाहता एआय हे तंत्रज्ञान 1987 पासूनचे आहे. तेव्हा ते बाल्यावस्थेत होते. त्यावेळी ते आजच्याएवढे प्रगत होईल असा कुणी विचारही केला नव्हता. परंतु हळुहळू क्रांती करत ते पुढे जात राहीले आणि आज ते एका अशा टप्प्यावर पोहोचले आहे की, मानवी विचारक्षमतेच्याही प्रगत झालेले आहे. म्हणूनच त्याचा धोका आहे. असे असले तरी सायबर सुरक्षा हा धोका आज संस्था, कंपनी, कॉर्पोरेट, देश, आतंकवाद यासारख्या प्रत्येक क्षेत्राला भेडसावत आहे. त्यातूनच आज भेडसावणारे प्रश्न निर्माण झालेले आहेत, असे वाघ यांनी सांगितले.

मोबाईलमुळे जीवनाचे हरण

श्री. शिरगांवकर यांनी बोलताना, एआय आणि सायबर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आता शिक्षण व्यवस्थेत आवश्यकतेनुसार बदल घडवून आणावे लागतील, असे सांगितले. एआय माणसावर वरचढ होऊ लागला असून माणूस स्वत: एका जागी सर्व कामे संगणकाकडून करवून घेऊ लागला आहे. त्यातून तासनतास अशाप्रकारे बसून राहिल्याने माणसाला नवनवे आजार बळावू लागले आहेत. मोबाईलने तर आम्हा प्रत्येकाचे संपूर्ण जीवनच हरण केले आहे. हे धोकादायक आहे, असे ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.