For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काळाचे भय मानसी धरू नको

06:22 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
काळाचे भय मानसी धरू नको
Advertisement

काळाचे उत्खनन करायला माणसाला फार आवडते. विशेषत: आयुष्याच्या उत्तरार्धात मनातल्या मनात आणि जनातही जगून चुकलेल्या काळाचे आवर्तन त्याच्या मनात सुरू असते. ‘आमच्या काळी‘ हे पालुपद आळवायला त्याला आवडते. जेव्हा मानसिक रिकामपण मिळते तेव्हा, अरे! आयुष्यामध्ये बरेच काही अळवावरच्या पाण्यासारखे अलगद निसटून गेले हे लक्षात येते आणि मनात एक पोकळी निर्माण होते. नंतर पुन्हा तीच ती उजळणी. आता जे गवसणार नाही ते इतरांना सांगताना थोडेफार का होईना ते क्षण जगता येतात एवढाच काय तो दिलासा. आयुष्याकडे फारसे मागे वळून बघू नये, वर्तमानातला प्रत्येक क्षण आनंद, उत्साह आणि नव्याने जगावा असे अध्यात्मशास्त्र म्हणते. त्यामुळे संचित जमा होत नाही आणि परमेश्वराचे नित्य नूतन नाम घ्यायला मन मोकळे असते; परंतु असे माणसांच्या बाबतीत क्वचितच घडते. सतत काळाची पडझड आणि बांधणी याने मन व्यापलेले असते.  कण व क्षण यातला आनंद निसटून जातो.

Advertisement

काळ या संकल्पनेपाशी मन सदैव गुंतलेले असते. एखादी दुर्घटना घडली, जिवलगांचा चिरवियोग झाला की काळ हेच दु:खावर रामबाण औषध आहे असे समाज म्हणतो. ते खरेही आहे. काळाची फुंकर जगणे सुसह्य करते. काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती असा प्रत्यय अनेकांना जीवनात येतो. एखाद्या अपघातामध्ये सारे सहप्रवासी मृत्युमुखी पडतात. कोणी भाग्यवंत वाचतो. काळ सोकावतो, काळ गिळतो आणि काळ अमरत्वही देतो. काळाची भीती संतांना नाही. कारण ते काळाला ओणवे ठेवून त्याच्या पाठीवर पाय देऊन ताठ उभे असतात. संत तुकाराम महाराजांचा एक छोटासा अभंग आहे, ‘जन्मा आलो त्याचे आजि फळ झाले साचे । तुम्ही सांभाळले संती । भय निरसले खंती । कृतकृत्य जालो । इच्छा केली ते पावलो । तुका म्हणे काळ । आता करू न शके बळ’  संत जन्माला येतात ते काळभूल नाहीशी करून जागृत अवस्थेत माणसाने जगावे म्हणूनच. जगाला भौतिक  विकासाकडे वेगाने घेऊन जाणारा काळ मनापाशी का थांबतो? मीमांसातीर्थ श्रीपादशास्त्राr किंजवडेकर म्हणतात, आजचे जग धावणारे आहे. उद्या ते उडणारे असेल. विज्ञानाची झेप मोठी आहे. परंतु आत्मसामर्थ्याचे आणि आत्मविकासाचे काय? माणसाला मंगळ ग्रहावर, चंद्रावर काय स्थिती, वातावरण आहे ते कळले, परंतु स्वत:च्या मनाचा थांगपत्ता त्याला लागत नाही. मला राग का येतो? भीती का वाटते? माझा पैशाचा लोभ का कमी होत नाही? हे काही त्याला कळत नाही. काळाचे बळ संतांच्या मनावर राज्य करू शकत नाही. कारण भक्ती. संत तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात, ‘रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल। हे तो आम्हा फोल भक्तीपुढे। तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत। बैसोनी निवांत सुख भोगू।’ शरीर संपले की नाते तुटते. भक्तीच्या नात्यावर मात्र काळाची सत्ता चालत नाही.

श्री शिवशंकर हे काळाचेही काळ आहेत. श्रीराम चरितमानसमध्ये श्री शंकराच्या विवाहप्रसंगाचे वर्णन केले आहे. नवरदेव म्हणून ते जेव्हा हिमालयाच्या घरी मांडवाद्वारी आले तेव्हा पार्वतीची आई मेनका औक्षण करायला दारात उभी होती. शिवाच्या सगुण रुपात सगळे ब्रह्मांड साठवले होते. मस्तकावर चंद्र, डोक्यावर गंगा, त्रिलोचन, भाळावर प्रकाश, नीळकंठ, गळ्यात माळा आणि नाग सर्प, हातामध्ये त्रिशूल, डमरू, वस्त्र म्हणजे व्याघ्रचर्म, सर्वांगाला विभूती. असे हे रूप आपल्या जावयाचे आहे हे बघून मेनकेला भोवळ आली. संत तुलसीदास म्हणतात, शिवशंकर हे फणीवरधर आहेत. नुसत्या सापाला बघून सगळ्यांची पाचावर धारण बसते. तिथे शंकरांनी साप, नाग गळ्यात धारण केले आहेत. ते मृत्युंजय आहेत. शिव म्हणजे निर्भयता. काळाला अवघे विश्व घाबरून असते. आपल्या मुलीचे पार्वतीचे सौभाग्य अखंड आहे कारण तिचे पतीदेव काळाचेही काळ आहेत हे मेनकेला कळले नाही म्हणून ती घाबरली.श्रीमारुतीराय म्हणजे शिवाचा अवतार. हनुमंत हे चिरंजीव आहेत. महाभारतात हनुमंत हे योद्ध्याच्या रूपात नाहीत, तर अर्जुनाच्या रथाच्या ध्वजस्तंभावर ते विराजमान आहेत. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘ध्वजस्तंभावरी वानरू। तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंगधरू। अर्जुनासी। हनुमान चालीसामध्ये म्हटले आहे की ‘हाथ वज्र औ ध्वजा बिराजे’. हनुमंताच्या हातामध्ये गदा, वज्र आणि ध्वज असतो. ध्वजस्तंभावरचे त्याचे रूप बघून वीरांना स्फुरण चढते. समर्थ रामदास स्वामी श्री मारुती स्तोत्रात म्हणतात, ‘ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे। काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भये।’ हे हनुमंताचे रूप महाभारतातील आहे. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, दुष्टांचा संहार करणारे माझे हे काळाग्नी रूप आहे. काळरुद्राग्नी हे शंकराचे संहारक रूप आहे. ही दोन्ही रूपे हनुमंताच्या ठिकाणी एकवटली आहेत. हनुमंताचे हे रूप बघून मृत्यू देखील भयाने कापतो.

Advertisement

श्री ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात  म्हणतात, ‘काळवेळ नाम उच्चारिता नाही। दोन्ही पक्ष पाही उध्दरती। रामकृष्ण नाम। सर्वदोषा हरण । जडजीवा तारण हरी एक।’ याचे निरूपण करताना पू. बाबा बेलसरे म्हणतात, भगवंत हा स्थळ आणि काळ यांच्या पलीकडे आहे. असा काळ नाही की ज्यावेळी भगवंताचे अस्तित्व लोपते, अशी जागा नाही की ज्या ठिकाणी भगवंत असत नाही. कुठेही, कधीही, केव्हाही भगवंताचे नाम घेतले की त्याला पोचते. भगवंताच्या नामाला शरण गेले की मनामधला काळही पुसून जातो.

समर्थ रामदास स्वामी म्हणतात, गेले बहुत प्रतापाचे। गेले बहुत सत्कीर्तीचे। गेले बहुत नीतीचे। नितीवंत राजे। गेले बहुत मतवादी। गेले बहुत कार्यवादी। गेले बहुत वेवादी। बहुता परीचे। जन्माला आलेला प्रत्येक जीव हा काळमुखात गेला. काळावर मात करून टिकले कोण? तर असो ऐसे सकळही गेले। परंतु एकच राहिले। जे स्वरूपाकार जाले । आत्मज्ञानी। यासाठी कलियुगात प्रभुच्या गोड नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. संतांनी हे परोपरीने ठासून सांगितले. संतांचे अवतारकार्य हे देह ठेवल्यानंतरही सुरू आहेच. शिवाय वाढते आहे. हे सर्व जाणतात. शिवस्तुतीमध्ये म्हटले आहे, शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रतपे ती नको, काळाचे भयमानसी धरू नको, दुष्टास शंकू नको। ज्याचिया स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको। ज्याच्या स्मरणाने सर्व पापांपासून उद्धार होतो ते परमेश्वराचे नाम माणसाला काळभयातून मुक्त करते.

स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.