For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंगावरील गाठींबाबत भीती नको!

10:44 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
अंगावरील गाठींबाबत भीती नको
Advertisement

पशुपालकांना दक्षता घेण्याचे पशुसंगोपन खात्याचे आवाहन : लाळ्याखुरकत लसीकरण आवश्यक

Advertisement

बेळगाव : लाळ्या प्रतिबंधक लसीकरणामुळे जनावरांच्या अंगावर गाठी येत असल्याने पशुपालकांतून भीती व्यक्त होत आहे. पशुसंगोपन खात्यामार्फत लाळ्या प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. घरोघरी जाऊन जनावरांना प्रतिबंधक लस दिली जात आहे. मात्र लसीमुळे जनावरांच्या अंगावर गाठी येण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. याबाबत पशुसंगोपन खात्याशी संपर्क साधला असता अशा घटना जिल्ह्यात तुरळक प्रमाणात घडल्या आहेत. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता लसीकरणावेळी दक्षता घ्यावी, असे आवाहनही पशुसंगोपन खात्याने केले आहे. लाळ्याखुरकत हा भयानक रोग असून, जनावरांना लागण झाल्यास मोठा धोका पोहोचतो. जनावरांची दूध क्षमता कमी होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. त्यासाठी प्रत्येक जनावराला लाळ्या प्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे. लम्पीने ग्रासलेले शेतकरी आता सुस्थितीत येऊ लागले आहेत. मात्र काही ठिकाणी लाळ्या रोगाची लागण झालेली जनावरे तुरळक प्रमाणात पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे धोका टाळण्यासाठी प्रत्येक जनावराचे लसीकरण होणे गरजेचे आहे.

पशुसखींची जबाबदारी

Advertisement

जनावरांना वेळेत लसीकरण आणि इतर सुविधा मिळाव्यात यासाठी गावोगावी पशुसखींची नेमणूक करण्यात आली आहे. लाळ्याखुरकत लसीकरणापासून एकही जनावर वंचित राहणार नाही, याची जबाबदारी पशुसखींवर आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन जागृती करण्याबरोबर प्रत्येक जनावराचे लसीकरण झाले की नाही? याची काळजी घेणे पशुसखींचे काम आहे.

वासरांनाही लस महत्त्वाची

चार महिन्यांवरील सर्व वासरांना लस देणे गरजेचे आहे. लहान  वासरांमध्ये या रोगाची लागण अधिक प्रमाणात होते. त्यामुळे तरुण वासरांना लस देणे गरजेचे आहे. लाळ्याखुरकत लसीकरणानंतर वासरांना बुस्टर डोस देणे गरजेचे आहे. लाळ्याखुरकत लसीकरणाबाबत पशुपालकांमध्ये समज आणि गैरसमज अधिक असल्याने बरीचशी जनावरे या लसीकरणापासून वंचित राहू लागली आहेत. त्यामुळे पशुपालकांनी मनात कोणताही गैरसमज न ठेवता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार सर्व जनावरांना लसीकरण करून घेणे गरजेचे बनले आहे.

Advertisement
Tags :

.