karvanda fruit | तासगावच्या बाजारपेठेत 'डोंगरच्या मैनी'ची एन्ट्री; करवंदांच्या आंबट-गोड चवीने रसिक तृप्त
तासगावात करवंदांची एंट्री;
तासगाब -उन्हाळ्याची चाहूल लागताच डोंगरद्रयात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या करवंदांनी बाजारपेठ गजबजू लागली आहे. 'डोंगरची मैना' म्हणून ओळखली जाणारी करवंदे आता स्थानिक बाजारात दाखल झाली असून नागरिकांकडून त्यांना मोठी मागणी मिळत आहे. तर ग्रामीण भागातील करवंदे गोळा करून विक्री करणाऱ्या महिलांची करवंदे घ्या करवंदे ही हाक सर्वांचेच लक्ष वेधत आहे.
-
करवंदे ही पूर्णपणे नैसर्गिक व रानमेवा असल्यामुळे आरोग्यासाठी लाभदायक मानली जातात. विशेषतः उष्णतेच्या दिवसांत शरीराला थंडावा देण्याचे काम ही फळे करतात. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत - सर्वच वयोगटातील नागरिक या फळांचा आस्वाद घेताना दिसत आहेत.सांगली जिल्ह्यातील डोंगराळ भागातून स्थानिक विक्रेते करवंदे - गोळा करून शहरातील बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. यंदा उत्पादन चांगले झाल्याने बाजारात करवंदांची आवक वाढली आहे. सुरुवातीला किंमत थोडी जास्त असली तरी आवक वाढल्याने दर कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
रस्त्याच्या कडेला तसेच आठवडी बाजारात करवंदांचे स्टॉल लागले असून, काही ठिकाणी महिलाही स्वयंरोजगाराच्या माध्यमातून करवंद विक्री करताना दिसत आहेत. त्यांची करवंदे घ्या करवंदे ही हाक लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधीही उपलब्ध होत आहे.
करवंदांपासून लोणचे, जॅम, सरबत असे विविध पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे घरगुती वापरासोबतच व्यावसायिक मागणीही वाढत आहे. यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचे चित्र आहे. एकंदरीतच, डोंगरातून येणाऱ्या या 'मैना'ने बाजारपेठेत चांगलीच रंगत आणली असून, उन्हाळ्यातील नैसर्गिक चव पुन्हा एकदा रसिकांना अनुभवायला मिळत आहे.