देणगी अपहार : नवी एसआयटी कार्यरत
वृत्तसंस्था
अयोध्या
अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत भक्तांनी दान केलेल्या पैशाचा अपहार झाल्या प्रकरणी आता नवी एसआयटी कार्यरत झाली आहे. या प्रकरणाचा तपास नव्या एसआयटीकडून करावा आणि या एसआयटीच्या प्रमुखपदी आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशानुसार उत्तर प्रदेश सरकारने नवे विशेष अन्वेषण दल (एसआयटी) स्थापन केले असून या दलाने आता या प्रकरणाचा तपास हाती घेतल्याची माहिती आहे.
या नव्या विशेष अन्वेषण दलाचे नेतृत्व उत्तर प्रदेश पोलिसांचे महानिरीक्षक किरण एस. यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या दलात तीन सदस्य असतील. अन्य दोघांची नावे सोमेन वर्मा आणि गौरव ग्रोव्हर अशी आहेत. सोमेन वर्मा हे अयोध्या विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक असून डॉ. गौरव ग्रोव्हर हे अयोध्या विभागाचे पोलीस पर्यवेक्षक आहेत. त्यांच्यासह या अन्वेषण दलात एक चार्टर्ड अकाऊंटंट आणि एका गुन्हाविज्ञान तपासनीस यांचाही समावेश करण्यात आला आहे. ही समिती लवकरात लवकर आपला अहवाल उत्तर प्रदेश सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाला सादर करणार आहे.