For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Indapur News: कालठणमध्ये काळभैरव मंदिराची दानपेटी चोरीला; चोरटा सीसीटीव्हीत कैद

04:30 PM Sep 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
indapur news  कालठणमध्ये काळभैरव मंदिराची दानपेटी चोरीला  चोरटा सीसीटीव्हीत कैद
Advertisement

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील कालठण नं. १ येथील ग्रामदैवत श्री काळभैरव मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी पहाटे घडली. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची संपूर्ण घटना कैद झाली असून, या प्रकारामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ३.२० वाजता अज्ञात व्यक्ती मंदिरात शिरली. त्याने मंदिरातील अंदाजे ४,००० ते ४,५०० रुपये रोकड असलेली दानपेटी उचलून तेथून पलायन केले. सकाळी मंदिरात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांना या घटनेची माहिती मिळाली.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर इंदापूर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. या प्रकरणी काकासाहेब बयाजी मांढरे (वय ६१, रा. कालठण नं. १) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये एनसीआर क्रमांक १४८५/२०२६ नोंदवण्यात आला आहे.

Advertisement

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध

मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित व्यक्तीची हालचाल कैद झाली आहे. त्याआधारे पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतला जात आहे. पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खान या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, परिसरात चोरीच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक नाळे यांनी केले आहे. गावागावांत ग्राम सुरक्षा दल स्थापन करून रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, तसेच परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना चोरट्याचा माग काढण्यात यश येते का आणि त्याला कधी अटक होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.