For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डोनाल्ड ट्रम्पच्या विजयाने नाराज देशांची लाभणार साथ?

06:27 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
डोनाल्ड ट्रम्पच्या विजयाने नाराज देशांची लाभणार साथ
Advertisement

अमेरिकेत सुरु असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला वेगळेच वळण लागले आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बिडेन यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली असून आता डेमोक्रेटीक पक्षातर्फे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना  उमेदवारी देण्याची मागणी पुढे केलेली आहे. प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर अमेरिकेतील निवडणुकीचे वारे अचानक बदलल्याने डेमोक्रेटिक पक्षाने ज्यो बिडेनवर दबाव वाढविल्याने बदलाची प्रक्रिया सुरु झाली.

Advertisement

राष्ट्राध्यक्ष ज्यो बिडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार सांभाळल्यापासून त्यांच्या विसरभोळेपणाची अदाकारी संपूर्ण जगाने पाहिली. अनेकवेळा भान हरपल्याने ते आपली वाट भरकटत असल्याचे

कॅमेराने टिपलेले आहे. बिडेन यांची खरी कसोटी लागली ती दोन महिन्यांपासून राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारात. प्रचारातील थेट संवादात त्यांचा विसराळूपणा अधिक अधोरेखित झाला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पुतीन यांचा उल्लेख करणे. आपल्या सहकारी उपराष्ट्राध्यक्षांच्या नावाचा विसर पडणे. त्याचप्रमाणे प्रचाराचे भाषण झाल्यानंतर आपली बायको समजून दुसऱ्याच महिलेचे चुंबन घेण्याचा केलेला प्रयत्न डेमोक्रेटिक पक्षासाठी डोकेदुखी ठरु लागली. त्यांच्या या विसरभोळेपणामुळे निवडणुकीत रसभंग होण्याची शक्यता असल्याने त्यांनी वेळीच माघार घेतली. या क्षणी माघार घेतल्याने डेमोक्रेटिक पक्षासमोर आता नवा उमेदवार शोधण्याचे संकट उभे ठाकले आहे.

Advertisement

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या मातब्बर उमेदवारापुढे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांची फटफजिती होऊ लागल्याने डेमोक्रेटिक पक्षाचे नेते बराक ओबामा आणि अन्य नेत्यांनी ज्यो बिडेन यांनी आपल्या उमेदवारीबाबत पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिला होता. आपल्या पक्षातील नेत्यांचा सल्ला विचारात घेऊनच ज्यो बिडेन यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याचे पसंत केले. अशाप्रकारची ही अमेरिकेतील दुसरी घटना असून 54 वर्षांपूर्वी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. व्हिएतनाम विरुध्द झालेल्या युद्धात नामुष्कीजनक पराभव पत्करल्यानंतर जॉन्सन यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागल्यानंतर निक्सन यांनी बाजी मारली होती.

ज्यो बिडेन यांनी माघार घेतल्यानंतर जगभरात अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. नोव्हेंबर 2024 मध्ये होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आता डेमोक्रेटिक पक्षाला नवा उमेदवार शोधावा लागत आहे. ज्यो बिडेन यांच्या माघारीमुळे दोन महिन्यांचा निवडणूक काळ फुकट गेल्याने आता या पक्षाला एक प्रभावी उमेदवाराचा शोध घ्यावा लागत आहे. दुसऱ्या बाजूने जागतिक पटलावर अनेक बदल घडून येणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण सत्तेवर आल्यानंतर रशिया युक्रेन युद्धापासून फारकत घेणार असल्याची घोषणा केल्याने झेलेन्स्की यांच्या पायाखालील वाळू सरकू लागली. कॅनडाबरोबरचे संबंध ताणले जाण्याची शक्यता असून इस्त्रायलला प्रबळ पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यातील मैत्रीला नव्याने उजाळा मिळण्याची शक्यता आहे.

डेमोक्रेटिक पक्षातील एका गटाने सौदी अरेबियाला दहशतवादाचा तारणहार असल्याचे सिद्ध करण्यासाठी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या माहितीचा आधार घेत संसदीय गटाने अमेरिकेवरील 2001 मध्ये झालेले हवाई हल्ले घडवून आणण्यात सौदी अरेबिया सरकारचा छुपा पाठिंबा असल्याचा अहवाल तयार केला होता. ओबामा प्रशासनाच्या कालखंडात तो संसदेच्या पटलावर ठेवण्यात आला होता. या अहवालामुळे सात दशकांपासूनच्या मैत्रीला तडा गेला. बिडेन प्रशासनाने या अहवालाच्या आधारे सौदी अरेबियाचे अमेरिकेतील संपत्ती गोठवण्याचे प्रयत्न सुरु केल्याने सौदीचे युवराज महंमद बिन सलमान यांनी पेट्रो डॉलर्सचा करार निकालात काढला. निवडणूक निकाल ट्रम्पच्या बाजूने लागल्यास कदाचीत सौदी अरेबिया अमेरिकेच्या जवळ जाण्याची शक्यता असेल.

रिपब्लिकन पक्षाची सत्ता आल्यास कॅनडाबरोबरच्या संबंधात काही प्रमाणात कटुता येण्याची शक्यता आहे. बिडेन प्रशासनाने कॅनडाला भारत विरोधात बोलण्यासाठी उद्युक्त केल्याचे उघड झालेले आहे. अमेरिकेच्या पाठिंब्यावरच कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी मोस्ट वाँटेड दहशतवादी हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणात भारत सरकारला गोवण्याचा प्रयत्न केला. तसेच खलिस्तानी समर्थकांना खलिस्तानच्या मागणीसाठी कॅनडामध्ये जनमत कौल घेण्यासाठी पाठबळ दिले. या सर्व कारवायांसाठी अमेरिकेचे प्रशासन सक्रिय बनल्याचे स्पष्ट झाले आहे. कॅनडाच्या हातात हात घालून अमेरिकेत स्थायिक झालेला खलिस्तानी नेता गुरुपतवन सिंग पन्नू याची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याचे अमेरिकन प्रवक्त्याने उघड केल्यापासून भारत आणि अमेरिका यांच्यात प्रस्थापित होत असलेले संबंध पुन्हा बिघडू लागले. त्यात भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून ती पाचव्या स्थानावर पोहोचल्याने बिडेन प्रशासन नाना हरकती करु लागले. त्यात भर म्हणून भारतीय लोकसभेच्या निवडणुकीत अमेरिकेने उघड हस्तक्षेप केल्याने तिसऱ्यांदा पंतप्रधान बनलेल्या नरेंद्र मोदी यांनी पहिल्या शंभर दिवसांत रशियाचा दौरा करून बिडेन प्रशासनाला चोख प्रत्यूत्तर दिले. या सर्वांचा परिणाम अमेरिकेतील भारतीय वंशाच्या मतदानावर होणार आहे.

डेमोक्रेट पक्षातर्फे आता विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या नावावर विचार सुरु केला असून श्रीमती हॅरिस यांनी केवळ दोन दिवसांत पक्षाच्या प्रचारासाठी रक्कम उभी करुन आपली दावेदारी बळकट केलेली आहे. कमला हॅरिस किंवा मिचेल ओबामा यांनी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविल्यास बिडेन यांच्यापेक्षा त्यांची उमेदवारी सरस ठरणार आहे. त्यामुळे अमेरिकेतील निवडणुकीत काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.

- प्रशांत कामत

Advertisement
Tags :

.