डोनाल्ड ट्रम्प यांचा झेलेन्स्कींना अल्टिमेटम
27 नोव्हेंबरपर्यंत अटी स्वीकारण्याचा सल्ला : शांतता चर्चेसाठीही प्रयत्न
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष थांबविण्यासाठी अमेरिकेकडून एकीकडे जोरदार प्रयत्न सुरू असतानाच ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना अल्टिमेटम दिल्याचे समजते. अमेरिका कोणत्याही परिस्थितीत हा संघर्ष संपवेल आणि युक्रेन 27 नोव्हेंबरपर्यंत प्रतिसाद देईल अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, अमेरिकेने कीवला पाठवलेला शांतता प्रस्ताव हा त्यांचा अंतिम प्रस्ताव नसून युक्रेनची इच्छा असल्यास ते पूर्ण ताकदीने लढाई सुरू ठेवू शकतात, असेही ट्रम्प म्हणाले. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलेल्या या मतांमुळे संदिग्धता निर्माण झाली आहे.
व्हाईट हाऊसमधील संभाषणादरम्यान ट्रम्प यांनी जर आपण 2022 मध्ये अध्यक्ष असतो तर रशिया-युक्रेन युद्ध कधीही सुरू झाले नसते, असा दावा केला. आता गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून हा संघर्ष धगधगत असून तो शमविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अमेरिका, युक्रेन आणि युरोपियन युनियन अधिकाऱ्यांनी ट्रम्पच्या शांतता योजनेवर जिनेव्हा येथे चर्चा सुरू ठेवली आहे. या चर्चेसाठी रशियाचे शिष्टमंडळही रविवारपासून आजपासून जिनेव्हा येथे पोहोचले आहे.
अमेरिकेचे रिपब्लिकन सिनेटर माइक राउंड्स यांनी वृत्त दिले की परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी सिनेटरना माहिती दिली की अमेरिकेने तयार केलेली 28 कलमी शांतता योजना प्रत्यक्षात रशियाकडून मिळालेल्या प्रस्तावावर आधारित आहे. तथापि, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या दाव्यावर सार्वजनिकपणे भाष्य केलेले नाही. दरम्यान, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि युक्रेनचे प्रतिनिधी जिनिव्हा येथे मसुद्याचा आढावा आणि सुधारणा करण्याबाबत चर्चा करणार आहेत.
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिकेच्या प्रस्तावावर चिंता व्यक्त करत कीव सध्या त्याच्या इतिहासातील सर्वात कठीण काळातून जात असल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेकडून येणारा मसुदा रशियाच्या हिताच्या जवळ असल्याचे दिसून येते आणि युक्रेनवर तो स्वीकारण्यासाठी दबाव वाढत आहे. आता देशाने आपली प्रतिष्ठा जपायची की एक प्रमुख मित्र गमावण्याचा धोका पत्करायचा अशी द्विधा स्थिती निर्माण झाल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.