डोनाल्ड ट्रम्प यांची नायजेरियाला धमकी
आमच्या बंदुका गरजण्यास तयार : ख्रिश्चनांची कत्तल रोखा, अन्यथा युद्ध
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पश्चिम आफ्रिकन देश नायजेरियाला इशारा देत आता आणखी ख्रिश्चनांचा नरसंहार झाल्यास अमेरिकेचे सैन्य तुटून पडणार असल्याचे बजावले आहे. संरक्षण विभागाला जलद सैन्य कारवाईसाठी तयार राहण्याचा निर्देश दिला आहे. अमेरिका तत्काळ प्रभावाने नायजेरियाला मिळणारे सर्व सहाय्य रोख असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
नायजेरियाचे सरकार ख्रिश्चनांना वाचविण्यास सक्षम नसेल तर अमेरिकेच्या बंदुका धडाडण्यास तयार आहेत. अमेरिका इस्लामिक दहशतवादाला समूळ नष्ट करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. जर आम्ही हल्ला केला, तर तो तीव्र, भयावह आणि निर्णायक असणार आहे. दहशतवादी आमच्या प्रिय ख्रिश्चनांवर हल्ला करत आहेत, याप्रकरणी नायजेरियन सरकारने तत्काळ पावले उचलावीत असा इशारा देत असल्याचे ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनीही कारवाईची तयारी करत असल्याचे सांगितले आहे. दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे धाडस नायजेरिया सरकारमध्ये नसेल तर अमेरिकेचे सैन्य इस्लामिक दहशतवाद फैलावणाऱ्या संघटनांना नेस्तनाबूत करेल असे हेगसेथ यांनी म्हटले आहे. धर्माच्या आधारावर अत्याचार होत असलेल्या देशांच्या यादीत नायजेरियाला ट्रम्प प्रशासनाने समाविष्ट केले आहे. या यादीत पाकिस्तान, रशिया, चीन, म्यानमार आणि उत्तर कोरियाही सामील आहे.
नायजेरियात हजारो ख्रिश्चन मारले गेले आहेत. तेथे इस्लामिक कट्टरवादी ख्रिश्चनांना लक्ष्य करत आहेत. तर दुसरीकडे नायजेरियाचे अध्यक्ष अहमद टिनुबु दरवेळी स्वत:ला धार्मिक स्वातंत्र्याचा रक्षक म्हणवून घेत आहेत. नायजेरिया दहशतवाद विरोधात लढत असून अमेरिका याप्रकरणी आमचा सहकारी राहिल अशी आशा असल्याचे नायजेरियाच्या विदेश मंत्रालयाने वक्तव्य जारी करत म्हटले आहे. नायजेरियात सध्या बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या हिंसक कारवाया सुरू आहेत.