डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी
न्यूयॉक : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या प्रशासनासाठी निवडण्यात आलेल्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. संरक्षण, गृहबांधणी, कृषी, कामगार विभागाची जबाबदारी मिळालेल्या नेत्यांना या धमक्या मिळाल्या आहेत. एफबीआयने याप्रकरणी तपास सुरू केला असल्याची माहिती ट्रम्प कॅबिनेटमधील नव्या माध्यम सचिव म्हणून निवड झालेल्या कॅरोलिन लेविट यांनी दिली आहे. या राजकीय हिंसेच्या धमक्यांची मी निंदा करतो असे अध्यक्ष जो बिडेन यांनी म्हटले आहे. तर धमकी मिळालेल्या नेत्यांना अद्याप अमेरिकन सिक्रेट एजेन्सीकडून सुरक्षा मिळालेली नाही. आतापर्यंत 8 नेत्यांनी धमकी मिळाली असून याप्रकरणाला आम्ही गांभीर्याने घेत आहोत असे एफबीआयने सांगितले आहे. तर बॉम्ब स्फोटाच्या धमकीसोबत ‘स्वॅटिंग’चे प्रकरणही समोर आले आहे.
स्वॅटिंग अमेरिकेच्या ‘स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिसशी संबंधित आहे. यात धोक्याची खोटी माहिती देणारे कॉल केले जातात आणि पीडिताच्या घरी स्वॅट टीम पाठविले जाते. रिपब्लिकन नेत्या एलिस स्टेफनिक यांना त्यांचे घर बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. ट्रम्प यांनी स्टेफनिक यांची निवड संयुक्त राष्ट्रसंघातील प्रतिनिधी म्हणून केली आहे. पती आणि तीन वर्षीय मुलासमवेत वॉशिंग्टनहून साराटोगा काउंटी येत जात असताना ही धमकी मिळाल्याचे स्टेफनिक यांनी सांगितले आहे. आतापर्यंत 8 नेत्यांनी धमकी मिळाल्याचा दावा केला आहे. संरक्षणमंत्री म्हणून निवड झालेल्या पीट हेगसेथ यांनीही धमकी मिळाल्याचा दावा केला आहे. पर्यावरण संरक्षण संस्थेच्या प्रमुख म्हणून निवड झालेल्या ली जेल्डि यांना त्यांचे घर पाइप बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली आहे.