डोनाल्ड ट्रम्प यांचा नेपाळला मोठा धक्का
‘टीपीएस’ समाप्तीमुळे हजारो नेपाळी नागरिकांना अमेरिका सोडावी लागणार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
2015 च्या विनाशकारी भूकंपानंतर अमेरिकेने नेपाळला दिलेला तात्पुरता संरक्षित दर्जा (टीपीएस) रद्द केला आहे. यावर्षी 24 जून रोजी ‘टीपीएस’ची मुदत संपल्यानंतर तो नेपाळसाठी वाढवला जाणार नाही, असे शनिवारी अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता नेपाळी नागरिकांना अमेरिकेतून बाहेर पडावे लागणार आहे. लाभार्थ्यांना मुदत संपल्यानंतर 5 ऑगस्टपर्यंत 60 दिवसांचा कालावधी दिला जाईल, असे अमेरिकेच्या गृह सुरक्षा सचिव क्रिस्टी नोएम यांनी सांगितले.
‘टीपीएस’ विशिष्ट देशांमधून इतर कोणत्याही कायदेशीर दर्जाशिवाय स्थलांतरितांना 18 महिने अमेरिकेत राहण्याची परवानगी देते. तसेच सामाजिक परिस्थिती सुरक्षित परत येण्यास अडथळा आणत असल्यास कायदेशीररित्या काम करण्याची सुविधा देखील प्रदान करते. 24 जून 2015 रोजी नेपाळला प्रथम 18 महिन्यांच्या कालावधीसाठी ‘टीपीएस’साठी अनुमती देण्यात आली होती. हा निर्णय विनाशकारी भूकंपानंतर घेण्यात आला होता. या आपत्तीमुळे तेथील राहणीमानात लक्षणीय परंतु तात्पुरता अडथळा निर्माण झाल्यामुळे अमेरिकेने नेपाळी नागरिकांना काही सूट जाहीर केली होती.
अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने 26 ऑक्टोबर 2016 रोजी ‘टीपीएस’ हा दर्जा आणखी 18 महिन्यांसाठी वाढवला आणि त्यानंतर हा कालावधी अनेकवेळा वाढवण्यात आला. त्यानुसार, सुमारे 12,700 नेपाळी नागरिकांना हा दर्जा प्राप्त असून त्यापैकी 5,500 हून अधिक लोक अमेरिकेचे कायदेशीर कायमचे रहिवासी बनले आहेत. तथापि, आता हा दर्जा संपल्यानंतर 7,000 हून अधिक नेपाळींना घरी परतावे लागेल.