कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डोनाल्ड ट्रम्प-झेलेन्स्की यांच्यात खडाजंगी

06:58 AM Mar 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वादावादीनंतर झेलेन्स्की व्हाईट हाऊसमधून ‘आऊट’ : ट्रम्प यांच्यासोबतची संयुक्त पत्रकार परिषदही रद्द

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात वादळी बैठक झाली. वॉशिंग्टनमध्ये व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या या चर्चेचे रुपांतर जोरदार शाब्दिक वादात झाले. शुक्रवारी रात्री दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या भेटीदरम्यान सुमारे 10 मिनिटे जोरदार वाद-विवाद झाला. या वादानंतर दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली. रशिया-युक्रेन युद्धाबाबत ट्रम्प यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना विरोध दर्शवल्यामुळे झेलेन्स्की संतप्त झाल्याची माहिती पुढे आली आहे. या वादानंतर झेलेन्स्की अमेरिकेतून थेट ब्रिटनमध्ये पोहोचले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसमधून हाकलून लावण्यात आले.  वादावादीनंतर युक्रेनियन प्रतिनिधी ओव्हल ऑफिसमधून बाहेर पडून दुसऱ्या खोलीत गेले. मात्र, अमेरिकन टीम तिथेच राहिली. यावेळी ट्रम्प यांनी उपराष्ट्राध्यक्ष व्हान्स, परराष्ट्रमंत्री रुबियो आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्झ यांच्याशी चर्चा केली. झेलेन्स्की वाटाघाटी करण्याच्या स्थितीत नाहीत, असे सांगत ट्रम्प यांनी माइक वॉल्ट्झ आणि रुबियो यांना स्वत: जाऊन झेलेन्स्की यांना आपली निघण्याची वेळ झाली असल्याचे सांगण्यास सांगितले. झेलेन्स्की यांच्या भेटीसाठी हे दोन्ही अधिकारी तिथे पोहोचले तेव्हा झेलेन्स्कींनी पुन्हा ट्रम्प यांच्याशी वाटाघाटी करण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु त्यांना संधी देण्यात आली नाही. या वादानंतर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी झेलेन्स्की यांना अनादर करणारे नेते म्हटले आहे. सुरुवातीला शांतपणे चर्चा झाल्यानंतर 10 मिनिटे या नेत्यांमध्ये हमरी-तुमरी झाल्याचे पाहायला मिळाले.

युद्धाचा मुद्दा उपस्थित

तुमची भूमिका तडजोड करण्याचा नाही, युक्रेन रशियाविरोधात युद्ध जिंकू शकत नाही, असे ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना स्पष्ट शब्दांत सांगितले. तत्पुर्वी, झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना पुतीन यांच्याशी शांतता चर्चेत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. अमेरिपेने जर रशिया आणि युक्रेन देशांमध्ये मध्यस्थी केली नाही तर दोन्ही देशांत कोणताही करार (युद्धविराम) होऊ शकणार नाही, असे उत्तर ट्रम्प यांनी दिले. हा वाद वाढत गेल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की  व्हाईट हाऊसमधून बाहेर पडताना दिसले.

...अन् वादाची ठिणगी पडली!

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी अमेरिका आणि रशियाच्या प्रतिनिधींमध्ये अलिकडेच चर्चा झाली होती. याबाबतचा मुद्दा ट्रम्प-झेलेन्स्की भेटीत उपस्थित करण्यात आला. झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष व्हेन्स यांना ‘तुम्ही कोणत्या प्रकारच्या मुत्सद्देगिरीबद्दल बोलत आहात?’ अशी विचारणा केली. त्यावर उत्तर देताना व्हेन्स यांनी मी युक्रेनमधील विनाश थांबवू शकणाऱ्या मुत्सद्देगिरीबद्दल बोलतोय असे व्हेन्स यांनी सांगितले. हाच वाद पुढे वाढत गेला.

युक्रेनच्या राजदूत तणावात

ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील चर्चेदरम्यान युक्रेनच्या अमेरिकेतील राजदूत ओक्साना मार्कारोवा अत्यंत तणावात होत्या. ओव्हल ऑफिसमधून प्रसिद्ध झालेल्या व्हीडिओत युक्रेनियन राजदूत आपल्या कपाळावर आणि चेहऱ्यावर हात ठेवताना दिसत आहेत. ओक्साना या ओव्हल ऑफिसमध्ये दोन्ही नेत्यांच्या जवळच बसलेल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरील चिंतेचे भाव जगभरातील माध्यमांच्या कॅम्रेयांनी टिपले आहेत.

मौल्यवान खनिजांचा करार अडचणीत

दोन्ही देशांमधील मौल्यवान खनिजांबाबत करार करण्यासाठी झेलेन्स्की अमेरिकेत पोहोचले होते. पण आता हा करार अडचणीत आला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या जोरदार वादविवादामुळे बैठकीनंतर नियोजित पत्रकार परिषददेखील रद्द करण्यात आली आणि झेलेन्स्कींना व्हाईट हाऊसमधून बाहेर पडावे लागले.

‘युक्रेन युद्ध जिंकू शकणार नाही’ : डोनाल्ड ट्रम्प यांनी ठणकावले

युक्रेन सध्या मोठ्या संकटात आहे. तुम्ही हे युद्ध जिंकू शकत नाही. पण जर तुम्ही आमच्यासोबत असाल तर तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याची संधी आहे. आम्ही तुम्हाला 350 अब्ज डॉलर्स दिले आहेत, लष्करी उपकरणे दिलीत. जर आम्ही लष्करी मदत दिली नसती तर हे युद्ध दोन आठवड्यात संपले असते. जर मी स्वत: पुढे येऊन रशिया आणि युक्रेन यांना एकत्र आणले नाही, तर तुम्ही कधीच युद्धविराम करू शकणार नाही. तुम्ही पुतीन यांचा तिरस्कार करत आहात. मी कठोर व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर मी जगातील इतर कोणापेक्षाही कठोर असू शकतो. पण, तुम्ही शांतता प्रस्थापित करू शकत नाही, असे ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना ठणकावल्याचे समजते.

सोशल मीडियावरही... शांतता हवी असेल तरच...

बैठकीनंतर ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक पोस्ट शेअर करताना झेलेन्स्की यांच्यावर अनेक आरोप केले. ‘बैठकीत अनेक गोष्टींवर चर्चा झाली. पण सामोपचाराच्या प्रयत्नांसाठी अमेरिका सक्रीय असल्यामुळे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की शांततेसाठी तयार नाहीत. मला कोणताही फायदा नको आहे. मला फक्त शांतता हवी आहे’ असे ट्रम्प म्हणाले. झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा अपमान केला आहे. जर त्यांना शांतता हवी असेल तर ते येथे परत येऊ शकतात.’ असेही ते पुढे म्हणाले.

आम्हीही शांततेसाठी तत्पर...!

या घटनेनंतर झेलेन्स्की यांनीही सोशल मीडियावरून एक पोस्ट करत युक्रेनला शांतता हवी असल्याचे म्हटले आहे. ‘अमेरिकेचे आभार, तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद, या भेटीबद्दल धन्यवाद, अमेरिकन अध्यक्ष, काँग्रेस आणि अमेरिकन जनतेचे आभार. युक्रेनला फक्त आणि फक्त शांतता हवी आहे आणि आम्ही त्यासाठी काम करत आहोत,’ असे झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले. त्यांनी अमेरिकन टीव्ही चॅनेल फॉक्स न्यूजला मुलाखतही दिली. या मुलाखतीत त्यांनी ओव्हल ऑफिसमध्ये जगभरातील माध्यमांसमोर जे घडले ते ‘योग्य नव्हते’ असे म्हटले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article