मिसौरी, इडाहो कॉकसमध्ये डोनाल्ड ट्रम्प विजयी
रिपब्लिकन उमेदवारीसाठी जोरदार आगेकूच
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इडाहो आणि मिसौरीमध्ये कॉकस जिंकून आणि मिशिगनमध्ये रिपब्लिकन पार्टीच्या संमेलनात सर्व डेलिगेट्सचे समर्थन प्राप्त करत अध्यक्षीय पदाच्या निवडणुकीत पक्षाचा उमेदवार होण्याची स्वत:ची दावेदारी बळकट केली आहे. याचबरोबर ट्रम्प यांना आतापर्यंत 244 डेलिगेट्सचे समर्थन मिळाले आहे. तर निक्की हेली यांना केवळ 24 डेलिगेट्सचे समर्थन प्राप्त झाले आहे. रिपब्लिक पार्टीची उमेदवारी प्राप्त करण्यासाठी कुठल्याही दावेदाराला किमान 1215 डेलिगेट्सच्या समर्थनाची आवश्यकता असते.
मिसौरी कॉकसमध्ये ट्रम्प यांनी 100 टक्के मते प्राप्त करत सर्व डेलिगेट्सचे समर्थन जिंकले. मिशिगनमध्ये पक्षाच्या एकूण 55 डेलिगेट्सपैकी 39 डेलिगटचे वाटप करण्यात आले. या दरम्यान ट्रम्प यांना सर्व 39 डेलिगेटचे समर्थन प्राप्त झाले.
हेली आणि ट्रम्प यांच्यादरम्यान 5 मार्च रोजी ‘सुपर ट्यूजडे’च्या दिनी होणारी लढत महत्त्वाची ठरणार आहे. देशभरातील 21 प्रांतांमध्ये 5 मार्च रोजी रिपब्लिकन प्रायमरी निवडणूक होणार आहे. सुपर ट्युजडे हा अमेरिकेच्या अध्यक्षीय पदाच्या उमेदवारांची निवड करण्यासाठी प्रायमरी निवडणुकीच्या प्रक्रियेचा महत्त्वाचा दिवस असतो, त्यादिवशी सर्वाधिक प्रांतांमध्ये प्रायमरी आणि कॉकस निवडणूक होते. अमेरिकेत अध्यक्षीय उमेदवारीच्या शर्यतीत ट्रम्प हे सध्या आघाडीवर आहेत.