For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डोनाल्ड ट्रम्प सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

06:55 AM May 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
डोनाल्ड ट्रम्प सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर
Advertisement

डोनाल्ड ट्रम्प सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

Advertisement

वृत्तसंस्था/ रियाध

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वत:च्या मध्यपूर्वेच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी सौदी अरेबियात पोहोचले आहेत. यादरम्यान सौदी वायुदलाने त्यांना हवाईक्षेत्रात सुरक्षा पुरविली आहे. सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी ट्रम्प यांचे विमानतळावर स्वागत केले. दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्यावर ट्रम्प यांचा हा पहिला औपचारिक विदेश दौरा आहे. यापूर्वी ते पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारात सामील होण्यासाठी 26 एप्रिल रोजी व्हॅटिकन येथे पोहोचले होते.

Advertisement

ट्रम्प हे 14 मे रोजी आखाती नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील आणि मग कतारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर 15 मे रोजी ट्रम्प हे स्वत:च्या दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी संयुक्त अरब अमिरातला भेट देणार आहेत.  अमेरिकेत अध्यक्ष झाल्यावर कॅनडा-मेक्सिको किंवा युरोपीय देशाचा दौरा करण्याची परंपरा आहे. ट्रम्प यांनी 2017 मध्ये अध्यक्ष झाल्यावर सर्वप्रथम सौदी अरेबियात पोहोचत ही परंपरा मोडली होती.

सर्वप्रथम सलमान यांच्याशी चर्चा

स्वत:च्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात ट्रम्प यांनी सर्वप्रथम सौदी अरेबियाचे युवराज सलामन यांनाच फोन केला होता. दोन्ही नेत्यांनी मध्यपूर्वेत स्थिरता आणणे, क्षेत्रीय सुरक्षेला मजबूत करणे आणि दहशतवादविरोधी सहकार्यावर चर्चा केली होती. यानंतर सौदी अरेबिया सरकारने पुढील 4 वर्षांमध्ये अमेरिकेत 600 अब्ज डॉलर्सची (50 लाख कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. सौदी अरेबियाच्या सॉवरेन वेल्थ फंड आणि पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडमध्ये 925 अब्ज डॉलर्सची भरभक्कम रक्कम आहे. सौदीने याच्या माध्यमातून यापूर्वीच अमेरिकेत मोठी गुंतवणूक केली आहे. तर युएईने देखील पुढील 10 वर्षांमध्ये अमेरिकेच्या एआय, सेमीकंडक्टर, एनर्जी आणि पायाभूत क्षेत्रात 1.4 ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची इच्छा दर्शविली आहे.

सौदी अरेबियाशी चांगले संबंध

ट्रम्प यांनी स्वत:च्या पहिल्या कार्यकाळात सौदी अरेबिया समवेत आखाती देशांसोबत चांगले संबंध प्रस्थापित केले होते. ट्रम्प यांचा पहिला कार्यकाळ संपल्यावरही सौदी अरेबियाने ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांच्या एका कंपनीत 2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली होती. जमाल खशोगी यांच्या हत्येनंतर सौदी अरेबिया आणि अमेरिकेच्या संबंधांवर प्रभाव पडला होता. अशास्थितीत कुशनर यांनी हा प्रभाव कमी करण्यास मदत केली होती असे मानले जाते. ट्रम्प यांनी लादलेल्या आयातशुल्कामुळे जगभरात उलथापालथ सुरू असताना ट्रम्प यांचा हा सौदी अरेबिया दौरा होतोय.

इस्रायल-सौदी अरेबिया संबंध

ट्रम्प यांनी मागील कार्यकाळात सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यात संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. तर पॅलेस्टाइन स्वतंत्र देश व्हावा, ज्याची राजधानी पूर्व जेरुसलेम असावी आणि इस्रायल-पॅलेस्टाइनदरम्यान 1967 पूर्वीसारखी सीमा असावी असे सौदी अरेबियाचे म्हणणे आहे.  सौदी अरेबियाने अब्राहम करारात सामील व्हावे अशी इच्छा ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. या कराराच्या अंतर्गत इस्रायल-सौदी अरेबियादरम्यान चांगले संबंध प्रस्थापित होतील आणि सौदी अरेबिया अमेरिकेसोबत एक मोठा संरक्षण करार करू शकणार आहे.

Advertisement
Tags :

.