डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा इराणला धमकी
अणुकार्यक्रम सोडण्याचा अमेरिकेचा इशारा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा कडक शब्दात धमकावले आहे. इराणने आपला अणुकार्यक्रम सोडला नाही तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेकडून देण्यात आला आहे. शनिवारी अमेरिका-इराण चर्चेपूर्वी ट्रम्पच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलाइन लेविट यांनी पत्रकारांना यासंबंधी माहिती दिली. इराण कधीही अण्वस्त्रs वापरणार नसल्याची खात्री करणे ही ट्रम्प यांची प्राथमिकता आहे. ट्रम्प राजनैतिक मार्गाने सोडवलेल्या तोडग्याचे समर्थन करतात, परंतु जर राजनैतिक निर्णय अयशस्वी झाला तर कठोर पावले उचलण्यासही तयार आहेत, असे कॅरोलाइन लेविट यांनी स्पष्ट केले. यापूर्वी 30 मार्च रोजी ट्रम्प यांनी इराणला धमकी देताना अणुकार्यक्रमावर करार न केल्यास बॉम्बहल्ला करण्याची धमकी दिली होती.
अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी शनिवारी ओमानमध्ये इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराक्ची यांची भेट घेतली. गेल्या दशकाहून अधिक काळातील अमेरिका आणि इराणमधील ही पहिलीच औपचारिक अणुचर्चा होती. इराणच्या सरकारी माध्यमांनुसार, ओमानचे परराष्ट्रमंत्री बदर अल-बुसैदी यांनी चर्चेत मध्यस्थीची भूमिका बजावली. अराक्ची आणि विटकॉफ यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित मुद्यांवर आणि इराणवरील निर्बंध उठवण्याबाबत चर्चा करताना एकमेकांच्या बाजू समजून घेतल्या. दोन्ही बाजूंनी पुढील आठवड्यात चर्चा पुन्हा सुरू करण्याचे मान्य केले.
इराणला 60 दिवसांची मुदत
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नवीन अणु करारावर सहमती दर्शवण्यासाठी 60 दिवसांचा कालावधी दिला आहे अन्यथा लष्करी कारवाईची धमकी दिली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना पत्राद्वारे हा इशारा देण्यात आला. तेहरानने वॉशिंग्टनशी वाटाघाटी करण्यास तयार असले पाहिजे, अन्यथा, इराणी सरकारची स्थिरता धोक्यात येऊ शकते, असे अमेरिकेने म्हटले आहे.