डोनाल्ड ट्रम्प: भस्मासुराचा उदय ?
येत्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा कारकीर्द सुरु होत आहे. तेव्हा अमेरिकेचे मित्र तसेच शत्रू यांच्यामध्ये जबर खळबळ माजलेली आहे. बऱ्याच देशांसह नेते मंडळींचा माज उतरवण्याची जणू आण घेऊनच वादग्रस्त ट्रम्प सत्तेवर येत असल्याने ‘ते आता करणार काय?’ या कल्पनेने जग जणू स्तब्धच झालेले आहे.
जगाच्या नकाशावर एका वादग्रस्त ‘दादा‘ चे आगमन झालेले आहे. तो कोणाला ठोकणार? कसे ठोकणार? आणि त्याचे परिणाम काय होणार? याबाबत सगळीकडे भीतीयुक्त आश्चर्य आहे. ट्रम्पचा जाच मित्रांना देखील होणार आहे कारण ‘आधीच मर्कट तयातची मद्य प्याला’ अशा प्रकारचे त्यांचे एकंदर व्यक्तीत्त्व आहे. त्यांचे रागलोभ प्रचंड आहेत. त्यामुळे ते कोणावर आणि कशी तलवार चालवणार याबाबत सारेच काळजीत आहेत.राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेण्यापूर्वीच त्यांनी तांडव सुरु केले आहे. अमेरिकेच्या सुरक्षेकरता ग्रीनलँड हा डेन्मार्कचा प्रचंड बर्फाळ प्रदेश वेळप्रसंगी लढाई करूनदेखील आपला बनवला पाहिजे असे भाष्य करून त्यांनी साऱ्या युरोपला अवाक केले आहे, तर पनामा कालवा घेण्याची गोष्ट करून त्यांनी दक्षिण अमेरिकेतील लहानमोठे शेजारी देश बैचैन करून टाकले आहेत. महाकाय कॅनडाला त्यांना अमेरिकेचे 51वे राज्य बनवायचे आहे.
थोडक्यात काय तर 21 व्या शतकात एका नवीन पद्धतीचा वसाहतवाद अमेरिका निर्माण करू पाहत आहे आणि त्याने युरोपमधील त्याचे मित्रदेश देखील हैराण झालेले आहेत. युरोपला जर अमेरिकेने निर्माण केलेल्या नाटोकडून संरक्षण व्यवस्था चालू ठेवावयाची असेल तर तेथील प्रगत देशांना त्याकरता मुबलक पैसा सोडावा लागेल. त्यांच्या संरक्षणाची फुकटची जबाबदारी अमेरिकेला नको आहे. रशिया आणि चीनपासून त्यांना स्वत:ला वाचवायचे असेल तर फुकटेपण चालणार नाही असा त्यांचा युरोपला संदेश आहे.
केवळ ट्रम्पच नव्हे तर त्यांचे सर्वात जवळचे सल्लागार जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक एलॉन मस्क यांनीदेखील ब्रिटन आणि जर्मनीच्या नेत्यांविषयी अश्लाघ्य भाषा वापरून गोंधळ उडवून दिलेला आहे. ट्रम्प यांची सर्वात जास्त प्राथमिकता ही चीनला धडा शिकवण्याची. चीनचे नेते क्षी जिनपिंग हे ट्रम्प यांचे दुसरे अवतार आहेत. ते देखील अमेरिकेस ‘ठकास महाठक‘ म्हणून टक्कर देण्यास तयार आहेत. अर्थव्यवस्था ठिक चालत नसल्याने चीन सध्या अडचणीत सापडलेला आहे पण तरीही ‘अरे ला कारे‘ करण्यास सज्ज आहे. टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात चीन पुढे जाऊ नये म्हणून ट्रम्प हे काही प्रगत तंत्रज्ञान त्याला मिळणार नाही अशा कामाला लागणार आहेत. त्याच अंदाज घेऊन अगोदरच चीनने त्याबाबत तजवीज करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
अमेरिकेने चीनला जगाची फॅक्टरी बनण्यात मदत केली आणि आता तो मोठा झाल्यावर जेव्हा अमेरिकेलाच वाकुल्या दाखवू लागला, तेव्हा त्याला खाली कसे खेचावयाचे या चिंतेने त्याला पछाडले आहे. जर ट्रम्प आणि क्षी जिनपिंग यांच्यात टक्कर सुरु राहिली तर भारतासारख्या देशांना त्याचा फायदाच होईल. आक्रमक चीनच्या भीतीनेच बरेच देश अमेरिकेबरोबर उभे आहेत हे एक सत्य आहे. पण क्षी जिनपिंग बेरके आहेत. ते आणि ट्रम्प हे दोघेही बेभरवशाचे आहेत. जर त्यांनीच एकमेकांशी डील केले तर मात्र भारतासह उर्वरित जग संकटात येईल ही भीती देखील जाणकार व्यक्त करत आहेत. ट्रम्प यांचा पाणउतारा चीनने केला तर त्याचा अर्थ तो वरचढ होऊ लागला आहे आणि अशी परिस्थितीदेखील उर्वरित जगाला सुखावह नाही. चीनने ब्रह्मपुत्रेवर जगातील सर्वात मोठे धरण बांधण्याचा मानस जाहीर करून भारताला अजून एका चिंतेत टाकलेले आहे. भारत-चीन सीमेवर सध्या शांतता असली तरी तणावाचे वातावरण आहे. भारत स्वत:ला कितीही मोठा समजत असला तरी चीन त्याला नगण्य मानतो. मोदी पंतप्रधान झाल्यापासून देखील त्यात बदल झालेला नाही. जर 20 वे शतक अमेरिकेचे होते तर 21 वे शतक आपले आहे अशी चीनची प्रामाणिक धारणा आहे.
सध्या तरी अमेरिकेचा पवित्रा चीनविरोधात राहणार आहे. ट्रम्प यांनी निवडलेले परराष्ट्र मंत्री तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे कडवे चीनविरोधी मानले जातात. चीनने आत्ता नरमाईचा सूर घेतलेला आहे. ट्रम्प यांच्या शपथविधीला चीनचे एक वरिष्ठ नेते क्षी जिनपिंग यांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. एल साल्वाडोर, अर्जेंटिना, इटलीच्या नेत्यांना बोलावण्यात आलेले आहे. ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना देखील निमंत्रण आहे.
राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर आपले पहिले काम हे रशिया आणि युक्रेन यातील युद्ध संपवणे आहे असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. त्यामुळेच युक्रेन युद्धात अडकलेल्या रशियन नेते व्लादिमिर पुतीन हे खुश आहेत. त्यांना येनकेनप्रकारे युक्रेनला गिळंकृत करावयाचे आहे. अडचणीत अडकलेला रशिया हा अलीकडील काळात चीनचा जणू मांडलिक झाला आहे असे चित्र दिसत असताना ट्रम्प-पुतीन भेट झाल्यावर रशियाला आपल्यापासून फोडण्याचे राजकारण अमेरिका करेल ही भीती चीनला सतावतेय. युरोपिअन राष्ट्रांना वेगळीच चिंता आहे. ट्रम्प-पुतीन भेटीत अमेरिका यूरोपच्या सुरक्षेकडे कानाडोळा करेल आणि त्यांना रशियन बागुलबुव्याला तोंड द्यायला लागेल.
इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मध्यपूर्वेत भडकलेल्या गाझा प्रकरणात युद्धविराम प्रस्ताव करून ट्रम्प यांना खुश केलेले आहे. हे युद्ध संपलेले नाही असे इस्राएल वारंवार म्हणत असले तरी पुढील चार वर्षे त्याला थोडे सबूरीनेच राहावे लागेल असे दिसत आहे. अमेरिकेने ज्याला जवळजवळ दोन दशकांपूर्वी यमसदनाला पाठवले तो इराकचा सद्दाम हुसेन हा अमेरिकेच्या मदतीनेच मोठा झाला होता आणि भस्मासुर बनला होता. मग त्याच्याकडे ‘वेपॉन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन‘ (डब्लू एम डी ) आहेत असा खोटा आरोप करून त्यांनी इराकला बेचिराख केले.
अशा परिस्थितीत ट्रम्प यांनी जगाचा बेताल बादशहा होण्याचा हा चालवलेला खटाटोप अमेरिकेच्या अंगलट देखील येऊ शकतो अशी भीती काही जाणकार व्यक्त करत आहेत. वाघ म्हणले तरी खातो, वाघोबा म्हणले तरी खातो, असे इतर देशांच्या ध्यानी आले तर उत्पात ठरलेला असे त्यांचे मत आहे. खलिस्तानवादी गुरुपतवंत पन्नून या अमेरिकन नागरिकाच्या हत्येचा प्रयत्नाच्या बाबत भारताने जो काही खुलासा केलेला आहे त्याचा अर्थच ट्रम्प अधिकारावर येण्याअगोदर आपली पाटी साफ आहे असे दाखवण्याचा प्रयत्न आहे असे मानले जाते. याचाच अर्थ बेभरंवशाचे कुळ असलेले ट्रम्प हे भारताबाबत प्रत्यक्षात कसे वागणार याबाबत नवी दिल्लीतील चिंताच दर्शवते.
अमेरिका आणि चीन जगाला आपापल्या प्रभावक्षेत्रात वाटण्याचे काम आता सुरु करणार अशी भीती व्यक्त होत असताना आपल्याकडील प्रसारमाध्यमे महाकुंभमेळा किती थाटात सुरु आहे याची रसभरीत वर्णने देण्यात गुंग आहे. चीनला ‘लाल आंख‘ दाखवण्याचे सोडाच वॉशिंग्टनमध्ये येत असलेला नवीन गोरा साहेब आपल्या धार्जिणा असणार की नसणार या काळजीतच देश अडकलेला आहे असे चित्र दिसत आहे. ते किती बरोबर अथवा चूक हे ज्याचे त्याने ठरवावे.
देशाकरता कसोटीचा काळ आहे हे मात्र खरे.
सुनील गाताडे