कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डोनाल्ड ट्रंप यांच्याकडून भारताची प्रशंसा

06:38 AM Oct 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाकिस्तानचे नेते शरीफ यांना धक्का, आंतरराष्ट्रीय  नेत्यांच्या साक्षीने गाझा करार, इस्रायल अनुपस्थित

Advertisement

वृत्तसंस्था / कैरो (इजिप्त)

Advertisement

इजिप्तची राजधानी कैरो येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी रात्री उशीरा गाझा करार करण्यात आला आहे. या प्रसंगी अनेक देशांचे प्रमुख नेते उपस्थित होते. युद्धात मोठ्या प्रमाणात हानीग्रस्त झालेल्या गाझा पट्टीच्या पुनर्विकासासाठी हा करार करण्यात आला आहे. मात्र, या संघर्षातील दोन महत्वाचे पक्ष इस्रायल आणि हमास हे दोन्ही या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या पुढाकाराने प्रस्थापित झालेली शांतता किती काळ टिकणार, या चर्चेलाही जागतिक वर्तुळात त्वरित प्रारंभ झाल्याचेही पहावयास मिळत आहे.

गाझा पट्टीत दोन वर्षांहून अधिक काळ होत असलेला संघर्ष आता संपला आहे. हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलच्या सर्व 20 अपहृतांची मुक्तता सोमवारी केली. तसेच चार मृत अपहृतांचे मृतदेहही इस्रायलच्या आधीन केले. इस्रालयने हमासच्या 1990 बंदींची मुक्तता केली. तसेच गाझा पट्टीतील आपली सेना विशिष्ट रेषेपर्यंत मागे आणली. यामुळे सोमवारी शांतता कराराचा प्रथम टप्पा पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर अनेक जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत इजिप्तची राजधानी कैरो येथील कार्यक्रमात गाझा पट्टीच्या विकास करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या कार्यक्रमात मुख्य भाषण ट्रंप यांचे होते.

भारताची प्रशंसा

अध्यक्ष ट्रंप यांनी आपल्या भाषणात या कराराची वैशिष्ट्यो स्पष्ट केली. गेल्या 3 हजार वर्षांमध्ये जे साध्य झाले नव्हते, ते आज साध्य झाले आहे. यापुढे या भागात कोणताही संघर्ष होणार नाही, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला पाकिस्तानचे नेते शाहाबाझ शरीफही उपस्थित होते. त्यांनी ट्रंप यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. तथापि, ट्रंप यांनी आपल्या भाषणात भारताची आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केल्याने शरीफ यांना धक्का बसल्याचे स्पष्टपणे कळून येत होते. भारत आणि पाकिस्तान यापुढे शांततेत एकमेकासमवेत नांदतील, असे भाकित ट्रंप यांनी त्यांच्या भाषणात केले. तसेच शरीफ यांच्याकडे वळून ‘असे होईल ना’ अशी विचारणा केल्याचे दिसून आले. हे सर्व शरीफ यांच्यासाठी अनपेक्षित होते, असे भाव शरीफ यांच्या चेहऱ्यावर उमटले होते, असे निरीक्षण या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पत्रकारांनी नोंदविले आहे.

मुनिर कोठे आहेत ?

पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि फिल्ड मार्शल असीम मुनिर यांचीही आठवण ट्रंप यांनी केली. ते येथे असावयास हवे होते. पण त्यांच्याजागी पाकिस्तानचे नेते शरीफ आले आहेत, असाही उल्लेख ट्रंप यांनी केल्याने, शरीफ यांची स्थिती अगदीच अवघडल्यासारखी झाल्याचेही दिसून आले. पाकिस्तानचे प्रमुख नेते शाहाबाझ शरीफ हे असूनही ट्रंप यांनी मुनिर यांना महत्व दिल्याची बाब शरीफ यांना फारशी पटलेली दिसली नाही, असेही उपस्थित पत्रकारांच्या लक्षात आले.

आता जटील टप्प्याचा प्रारंभ

मध्यपूर्वेतील शांततेच्या सर्वात कठीण टप्प्याला यापुढे प्रारंभ होणार आहे. गाझा पट्टीचे नियंत्रण कोणाकडे असावे, तसेच हमास या संघटनेचे नि:शस्त्रीकरण हे महत्वाचे मुद्दे आहेत. गाझामधून हमासला बाहेर काढण्याची योजना आहे. या योजनेला हमासचा विरोध आहे. तर स्वतंत्र पॅलेस्टाईन राष्ट्र स्थापनेला इस्रायलचा विरोध आहे. या करारात स्वतंत्र पॅलेस्टाईन राष्ट्राच्या स्थापनेचा उल्लेखही नाही. त्यामुळे काही अरब राष्टे नाराज आहेत, अशी स्थिती आहे. हमास या संघटनेची निर्मिती आणि पालनपोषण इराणने केले आहे. या सर्व घडामोडींवर अद्याप इराणने प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. हमास इतिहासजमा झाल्याशिवाय या भागात शांतता नांदणार नाही, असे मतही अनेक तज्ञांनी व्यक्त केलेले आहे.

इस्रायलमध्ये असंतोष

हमासने सर्व जिवंत अपहृतांची मुक्तता केली आहे. मात्र, अद्यापही जे अपहृत बंदीवासात मृत्यू पावलेले आहेत. त्या सर्वांचे मृतदेह इस्रायलला दिलेले नाहीत. या मृत अपहृतांचे कुटुंबिय त्यांच्या मृतदेहांची प्रतीक्षा करीत आहेत. ते न सोपविल्याने त्यांच्यात नाराजीची भावना आहे. शांतता प्रस्थापित व्हावी, पण इस्रायलने गाझा पट्टीवरील नियंत्रण सोडू नये, अशी इस्रायलच्या असंख्य नागरीकांची इच्छा आहे. तसेच, हमासही स्वत:ला नि:शस्त्र करण्यास आणि गाझा पट्टीतून बाहेर जाण्यास तयार नाही. हमास आणि अरब देश यांना स्वतंत्र पॅलेस्टाईन राष्ट्र हवे आहे, जे इस्रायलला नको आहे. तेव्हा या सर्व परस्परविरोधी स्थितीतून पुढचा तोडगा कसा काढणार, हा प्रश्न प्रत्येक राजकीय निरीक्षकाच्या तोंडी असल्याचे दिसून येत आहे.

गाझा करारावर स्वाक्षऱ्या

ड गाझा करारावर अमेरिका, इजिप्त, तुर्कस्थान इत्यादी देशांच्या स्वाक्षऱ्या

ड इस्रायल आणि हमास यांच्या नेत्यांच्या कार्यक्रमाला अनुपस्थितीची चर्चा

ड तीन हजार वर्षांमध्ये जे साध्य झाले नाही, ते आज झाले : डोनाल्ड ट्रंप

ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ट्रंप यांना प्रशंसापर संदेश, शुभकामना

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article